...म्हणून दिल्लीतील 'या' रिक्षाचालकावर होतोय कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 10:13 IST2018-11-06T09:44:25+5:302018-11-06T10:13:37+5:30
महिलांसाठी असुरक्षित अशी ओळख असलेल्या दिल्लीमध्ये एका रिक्षाचालकाने आपल्या कृत्याद्वारे सर्वांचंच मन जिंकलं आहे. प्रवीण रंजन असं या रिक्षाचालकाचं नाव असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

...म्हणून दिल्लीतील 'या' रिक्षाचालकावर होतोय कौतुकाचा वर्षाव
नवी दिल्ली - विनयभंग आणि बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे रात्रीच्या वेळी महिलांना एकटं घराबाहेर जाणं कठीण झालं आहे. महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असतानाच काही लोक महिलांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या मदतीसाठी प्रामुख्याने पुढाकार घेत असलेले देखील पाहायला मिळतात. महिलांसाठी असुरक्षित अशी ओळख असलेल्या दिल्लीमध्ये एका रिक्षाचालकाने आपल्या कृत्याद्वारे सर्वांचंच मन जिंकलं आहे. प्रवीण रंजन असं या रिक्षाचालकाचं नाव असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दिल्लीतील एक तरुणी ऑफिसमधून रात्री उशीरा आपल्या घरी परतत असताना तिने घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत होती. रात्रीच्या वेळी दिल्लीच्या रस्त्यावर एकट्या मुलीने फिरणं हे अत्यंत धोकादायक आहे. मात्र तरुणीला त्याचदरम्यान एक रिक्षाचालक दिसला. रिक्षाचालकाने भाडे न आकारता सुरक्षितपणे तरुणीला तिच्या घरी पोहचवलं. प्रवीण यांनी केलेल्या कृत्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव होत आहे.
नेहा दास असं तरुणीचं नाव असून नेहाने आपल्या फेसबुक पेजवर हा संपूर्ण प्रकार सांगितला. 'मी रिक्षाची वाट पाहत असताना एक सभ्य रिक्षाचालक माझ्याजवळ येवून थांबला. मी त्याला किती भाडं होणार विचारलं असता, मॅडम मी इतक्या रात्रीच्या वेळी महिलांकडून पैसे घेत नाही. कारण त्यांना सुखरुप घरी पोहोचवणं जास्त गरजेचं आहे असं तो म्हणाला. थोड्यावेळाने मी घरी पोहोचल्यावर त्यांना भाड्याचे पैसे देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी नकार दिला. मी भाड्याव्यतिरिक्त अधिकचे पैसे देण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. मी वारंवार त्यांना पैसे घेण्याची विनंती करत होते, त्यामुळे त्यांनी अखेर केवळ भाड्याचे योग्य तेच पैसे घेतले. त्यानंतर रिक्षातून उतरताना मी त्यांचा फोटो काढण्याची परवानगी मागितली तर त्यावर त्यांनी स्मितहास्य करत मला फोटो काढू दिला' असं नेहाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. नेहाची ही फेसबुक पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. तसेच नेहाने आपल्या पोस्टमध्ये प्रवीण रंजन यांचे आभार मानले आहेत.