दिल्लीच्या 'बाबर रोड' नावाच्या जागी 'अयोध्या मार्ग'; हिंदू सेनेने लावले पोस्टर, प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 10:38 AM2024-01-20T10:38:37+5:302024-01-20T10:39:52+5:30
श्रीराम मंदिराच्या भव्य सोहळ्यापूर्वी दिल्लीतील फलकावर चिकटवण्यात आले पोस्टर
Babar Road Ayodhya Marg Delhi: एकीकडे अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठा करण्याचे विधी सुरू आहेत. तर दुसरीकडे दिल्लीतील बाबर रोडच्या फलकावर अयोध्या मार्गचे पोस्टर चिकटवण्यात आले आहेत. हिंदू सेनेने शनिवारी दिल्लीतील बाबर रोडच्या फलकावर अयोध्या मार्गाचे पोस्टर चिकटवले. यापूर्वीही बाबर रोडसह इतर मुघल शासकांच्या नावावर असलेल्या रस्त्यांची नावे बदलण्यात यावीत, अशी मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात आली आहे. तशातच आता राम मंदिराच्या उभारणीसोबतच अयोध्येत प्राणप्रतिष्ठेचे कार्यक्रम सुरू असताना, हे पोस्टर चिकटवून हिंदू सेनेने पुन्हा एकदा ही मागणी लावून धरली आहे.
मुघल शासक बाबरचा सेनापती मीर बांकी याने अयोध्येतील राम मंदिर पाडून बाबरी मशीद बांधल्याचे सांगितले जाते. यानंतर अनेक वाद झाले. हजारो लोकांना जीव गमवावा लागला होता. आज सुमारे ५०० वर्षांनंतर अयोध्येत राम मंदिर बांधले गेले असून, रामललाची २२ जानेवारीला विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्याच वेळी हिंदू संघटनांचा मुघल शासकांच्या नावांना विरोध असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
गर्भगृहात रामललाच्या नवीन मूर्तीची स्थापना
२२ जानेवारीला अयोध्येत भव्य श्री राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्याच दिवशी अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाची नवीन मूर्ती बसवण्यात आली आहे. पुजाऱ्यांनीही मंदिर परिसर आणि गर्भगृहात पूजेचा विधी सुरू केला आहे. तब्बल ५०० वर्षांनंतर रामलला आता भव्य राम मंदिरात विराजमान झाले असून त्यांच्या मुर्तीची पहिली झलक साऱ्यांना शुक्रवारी पाहायला मिळाली.
दरम्यान, राम मंदिराच्या उद्घाटनाची विशेष तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः उद्घाटनाच्या कामाचा आढावा घेत आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत पोहोचून अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि बाबींचा आढावा घेतला आहे. राम मंदिरात मोठ्या संख्येने व्हीव्हीआयपी येणार आहेत. ही बाब लक्षात घेता, प्रत्येक कानाकोपऱ्यात पोलीस-सैनिक तैनात करण्यात आले आहेत.