दिल्ली बनली 'गॅस चेंबर', AQI ७००च्या पार; शाळांना ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 09:28 PM2023-11-02T21:28:20+5:302023-11-02T21:30:02+5:30
. दिल्ली-एनसीआरमध्ये बीएस३ पेट्रोल आणि बीएस४ डिझेल-४ वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.
नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली आणि परिसरात प्रदूषणामुळे आज दिवसभर धुके होते. यामुळे आज हवा गुणवत्ता आणि व्यवस्थापन आयोगाने ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP)चा टप्पा III लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दिल्लीतील आनंद विहार भागातील हवेची गुणवत्ता (AQI)आज सकाळी १० वाजता ७४०सह वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली. दिल्लीच्या सरासरी हवेच्या गुणवत्तेबद्दल विचार केल्यास ते ३९२ नोंदवले गेले, जे 'अत्यंत खराब' श्रेणीमध्ये येते आणि कमाल तापमान ३०.२ अंश सेल्सिअस होते. एका आकडेवारीनुसार, दिल्लीतील ३७ क्षेत्रांपैकी किमान १८ हवेची गुणवत्ता 'गंभीर' श्रेणीत नोंदवले गेले.
दिल्ली एनसीआरमध्ये आपत्कालीन सेवा, सरकारी बांधकाम आणि धोरणात्मक महत्त्वाची बांधकामे याशिवाय सर्व प्रकारच्या बांधकामांवर आणि पाडण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये बीएस३ पेट्रोल आणि बीएस४ डिझेल-४ वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, सरकारने आवश्यक वाटल्यास ५वीपर्यंतच्या मुलांसाठी शाळेत न जाता ऑनलाइन वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशा सूचना हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने दिल्या आहेत.
कोणत्या क्षेत्रात AQI किती आहे?
ज्या भागात AQI ने ४००ची पातळी ओलांडली आहे ते म्हणजे आनंद विहार (४५०), बवाना (४५२), बुरारी क्रॉसिंग (४०८), द्वारका सेक्टर ८ (४४५), जहांगीरपुरी (४३३), मुंडका (४६०), NSITद्वारका (४०६), नजफगढ (४१४), नरेला (४३३), नेहरू नगर (४००), न्यू मोती बाग (४२३), ओखला फेज २ (४१५), पटपरगंज (४१२), पंजाबी बाग (४४५), आरके पुरम (४१७), रोहिणी (४५४), शादीपूर (४०७) आणि वजीरपूर (४३५).
हवेची गुणवत्ता कशी मोजली जाते?
शून्य ते ५० मधील AQI 'चांगला' आहे, ५१ ते १०० 'समाधानकारक' आहे. १०१ ते २०० 'मध्यम' आहे, २०१ ते ३०० 'खराब' आहे, ३०१ ते ४०० 'अतिशय वाईट' आहे. ५०० आणि ५००मधील AQI 'गंभीर' मानला जातो.
येत्या काही दिवसांत हवामान कसे असेल?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन दिवसांत राजधानीत हलके धुके पडेल. आजच्या घडीला संपूर्ण दिल्ली-एनसीआर विषारी धुराच्या गर्तेत आहे. आज दुपारी आनंद विहारमध्ये हलक्या वाऱ्याने AQI कमी केल्यामुळे नोएडा देशातील सर्वात प्रदूषित शहर बनले. दुपारी १२ वाजता, नोएडामध्ये AQI ६९५, त्यानंतर दिल्लीच्या पुसा रोडमध्ये ६७८ आणि जहांगीरपुरीमध्ये ६६९ नोंदवले गेले. हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, खराब हवेच्या गुणवत्तेचे मुख्य कारण म्हणजे पंजाबमध्ये भुसभुशीत जाळणे हे आहे. गेल्या २४ तासांत १९०० हून अधिक घटनांमध्ये वाढ झाली आहे. हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाऊस नसल्याने येत्या काही दिवसांत परिस्थिती अशीच राहण्याची किंवा आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.