दिल्लीत भाजपाने निवडणूकपूर्व सर्व्हे केला; घबाडच सापडले पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 10:26 PM2020-01-05T22:26:11+5:302020-01-06T17:01:16+5:30
दिल्लीमध्ये भाजपाने अंतर्गत सर्व्हे केला आहे. यातून आम आदमी पक्षाची मोठी पडती बाजूच भाजपाच्या हाती लागली आहे.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभेला सडकून मार खाणाऱ्या आपला दिल्ली विधानसभा काहीही करून टिकवायची आहे. तर देशावर बहुमत असणाऱ्या भाजपाला राजधानी काबीज करायची आहे. गेल्या वेळी बहुमत न मिळाल्याने भाजपाला सत्ता गमवावी लागली होती. फेरनिवडणुकीमध्ये भाजपासह काँग्रेसला आपने अक्षरश: झोपविले होते. हा पराभव जिव्हारी लागलेल्या भाजपाच्या धुरीणांना नुकताच केलेला सर्व्हे खुनावू लागला आहे.
दिल्लीमध्ये भाजपाने अंतर्गत सर्व्हे केला आहे. यातून आम आदमी पक्षाची मोठी पडती बाजूच भाजपाच्या हाती लागली आहे. यामुळे भाजपा प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळी रणनीती राबविणार आहे. यासाठी भाजपामध्ये जोरदार तयारी सुरू झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकांची पहिली पसंती आहे. त्यांनी दिलेली मोफत वीज, पाणी, मोहल्ला क्लिनिक आणि अन्य सुविधा दिल्लीकरांवर गारूड करून आहेत. यामुळे भाजपाला वेगळी रणनीती आखण्याची गरज भासू लागली आहे.
दिल्लीमधील महानगरपालिका या भाजपाच्या ताब्यात आहेत. तर लोकसभा मतदारसंघही भाजपाकडेच आहेत. मात्र, राज्य काही भाजपाच्या ताब्यात आलेले नाही. याचेच शल्य भाजपाच्या दिल्लीत बसणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना सतावत आहे. यंदाच्या निवडणुकीत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी भाजपाने प्रत्येक मतदारसंघात अनुभवी कार्यकर्त्यांची टीमच तैनात केली आहे.
दिल्लीकरांची केजरीवालांना पसंती, तर स्थानिक आमदारांबाबत राग असल्याचे भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये पुढे आले आहे. यामुळे स्थानिक समस्या, मुद्द्यांना हवा दिली जाणार आहे. केजरीवालांच्या योजनांविरोधात मोदी सरकारच्या योजनांची माहिती देणे, आप सरकार आणि त्यांच्या आमदारांची पोलखोल करणे अशी रणनिती असणार असल्याचे भाजपाच्या नेत्याने सांगितले.
स्थानिक आमदारांनी दिलेली आश्वासनांची पोलखोल आणि प्रत्यक्षातील माहिती समोर ठेवली जाणार आहे. तसेच स्थानिक विकासासाठी एक रोडमॅपही ठेवण्यात येणार आहे.