Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर अमित शाह अॅक्शन मोडमध्ये, बंगाल दौरा रद्द; दिले असे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 09:12 AM2021-01-30T09:12:34+5:302021-01-30T09:15:43+5:30
स्फोटानंतर पोलिसांचे विशेष पथक सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्फोट झाल्याची पुष्टी केली. हा स्फोट फुटपाथजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
नवी दिल्ली - येथील इस्रायली दूतावासाजवळ मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात कुणालाही इजा झाल्याचे वृत्त नाही. मात्र, येथील अनेक कारचे नुकसान झाल्याचे समजते. हा दहशतवादी हल्ला असल्याचे इस्रायलने म्हटले आहे, तर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे भारताने म्हटले आहे. या स्फोटानंतर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह इतर राज्यांतही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
स्फोटानंतर पोलिसांचे विशेष पथक सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्फोट झाल्याची पुष्टी केली. हा स्फोट फुटपाथजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हा स्फोट शुक्रवारी सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी झाला. यात 4 ते 5 कारच्या काचा फुटल्या आहेत. एनआयएचे पथकही स्फोटाचा तपास करत आहे.
शाह यांचा बंगाल दौरा रद्द -
दिल्लीत झालेल्या या स्फोटानंतर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी संरक्षण अधिकाऱ्यांसो बैठक केली. या बैठकीला संरक्षण आणि गुप्तचर संस्थांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत दिल्ली पोलिसांना याप्रकरणी लवकरात लवकर तपास पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच गुप्तचर संस्थांनाही दिल्ली पोलिसांना शक्त ती सर्वप्रकारची मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गृह मंत्री आज शनिवारीही बैठक घेऊन आढावा घेऊ शकतात.
विशेष म्हणजे, दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन आणि शुक्रवारी सायंकाळी झालेल्या स्फोटानंतर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी शनिवारचा आपला बंगाल दौराही रद्द केला आहे. याशिवाय स्फोटानंतर, आम्हाला भारतावर पूर्ण विश्वास आहे, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे. त्यांना घटनाक्रमासंदर्भात अपडेटही देण्यात आले आहे.
मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश -
दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले आहेत. "दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांशी चर्चा करून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले," असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे. तसेच "राज्यातील जनतेनेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे," असे आवाहनही त्यांनी केले आहे.
उत्तर प्रदेश सरकारचेही अधिकाऱ्यांना निर्देश -
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासासमोर झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी, वरिष्ठ पुलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तांना आपापल्या जिल्ह्यातील मुख्य ठिकाणे, धार्मिक स्थळे आणि इतर संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.