दिल्ली स्फोट - इस्रायली दूतावासाबाहेर पोलिसांना सापडले बंद पाकीट, CCTV तूनही पुरावे हाती
By महेश गलांडे | Published: January 30, 2021 08:05 AM2021-01-30T08:05:04+5:302021-01-30T08:06:28+5:30
शुक्रवारी सायंकाळी देशाच्या राजधानी दिल्लीत आयईडी स्फोटाची घटना इस्त्रायली दूतावासाच्या बाहेर शुक्रवारी घडली. कमी तीव्रतेच्या स्फोटामुळे काही कारच्या काचा फुटल्या आहेत. सध्या, घटनास्थळी दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल तपास करत आहे
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून महाराष्ट्रातही कडक बंदोबस्त तैनात असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याशी चर्चा करुन राज्यातील सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दिल्लीतील या स्फोटात सुदैवाने जीवितहानी झाली नाही, तरीही परिस्थिती गंभीर असून याचा कसून तपास सुरू आहे. पोलिसांना इस्रायली दूतावासाजवळ एक पाकीट सापडलं आहे.
शुक्रवारी सायंकाळी देशाच्या राजधानी दिल्लीत आयईडी स्फोटाची घटना इस्त्रायली दूतावासाच्या बाहेर शुक्रवारी घडली. कमी तीव्रतेच्या स्फोटामुळे काही कारच्या काचा फुटल्या आहेत. सध्या, घटनास्थळी दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल तपास करत आहे. दिल्ली पोलिसांना इस्रायली दूतावासाबाहेर एक बंद पाकीट सापडलं आहे, ज्यामध्ये इस्रायली दूतावासासंबंधित उल्लेख केला आहे. तसेच, 3 सीसीटीव्ही कॅमेऱ्यातूनही काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र, अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली नाही. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, फायर ब्रिगेडची गाडी येईपर्यंत पोलिसांनी आधीच संपूर्ण परिसर व्यापला होता. फायर कारनेही जाऊ दिले नाही. औरंगजेब रोडवर बॉम्बचा स्फोट झाला होता, असे अग्निशमन नियंत्रण कक्षाला 6 वाजता फोन आला. हा फोन येताच घटनास्थळावर कॅनॉट प्लेस येथील अग्निशमन केंद्रातून तीन वाहने पाठविली गेली.
29-29 कनेक्शन
भारत आणि इस्रायलदेखील त्यांच्या राजनैतिक संबंधांचा आज 29 वा वर्धापन दिन साजरा करीत आहेत. याबाबत इस्त्रायली दूतावासानेही ट्विट केले आहे. २०१२ साली फेब्रुवारी महिन्यात इस्त्रायली दूतावासाच्या अधिकाऱ्यांच्या कारला लक्ष्य करण्यात आले होते आणि बॉम्बस्फोट घडवून आणला होता. विशेष म्हणजे काल 29 तारखेलाच बीटिंग रिट्रीट सोहळाही पार पडत होता. त्यामुळे, 29-29 असं कनेक्शन असल्याचा प्राथमिक तपास पोलिसांकडून होत आहे.
खळबळ उडवण्यासाठी स्फोट
इस्त्रायली दूतावासापासून सुमारे 150 मीटर अंतरावर हा स्फोट झाला. अग्निशमन विभागाची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. घटनास्थळी दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत. डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोडवर इस्राईलचे दूतावास आहे. संपूर्ण परिसर सीलबंद करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांव्यतिरिक्त पीआरओ अनिल मित्तल म्हणाले की, प्राथमिक तपासणीतून असे दिसते की, एखाद्याने खळबळ उडवण्यासाठी हे केले असेल.
काही किमी अंतरावर सुरु होता बीटिंग रिट्रीट सोहळा
दिल्लीतील औरंगजेब मार्गावरील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटामुळे दिल्ली पोलिसांत खळबळ उडाली आहे. या परिसरापासून काही किलोमीटर अंतरावर बीटिंग रिट्रीट सोहळा चालू असताना स्फोट झाला होता, जिथे अनेक व्हीआयपी उपस्थित असतात.
राज्यात हाय अलर्ट
राज्यातील जनतेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळविण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच सावधगिरी म्हणून दिल्ली विमानतळ, सरकारी इमारती आणि महत्वाच्या ठिकाणी अलर्ट जरी करून सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती सीआयएसएफने दिली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील करी रोड येथील फ्युचरेक्स मॅरॅथॉन इमारतीत कॉन्सुलेट जनरल ऑफ इस्राईलचे कार्यालय असून तेथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एन. एम जोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे कार्यालय येते.