Delhi Budget 2022 Highlights: २० लाख नोकऱ्या, नाइट लाइफ, नवं मार्केट! बजेटमध्ये केजरीवाल सरकारचं दिल्लीला बदलण्याचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 03:25 PM2022-03-26T15:25:18+5:302022-03-26T15:28:26+5:30

दिल्ली सरकारनं 2022-23 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

delhi budget 2022 23 manish sisodia aap govt arvind kejriwal highlights jobs health card transport | Delhi Budget 2022 Highlights: २० लाख नोकऱ्या, नाइट लाइफ, नवं मार्केट! बजेटमध्ये केजरीवाल सरकारचं दिल्लीला बदलण्याचं आश्वासन

Delhi Budget 2022 Highlights: २० लाख नोकऱ्या, नाइट लाइफ, नवं मार्केट! बजेटमध्ये केजरीवाल सरकारचं दिल्लीला बदलण्याचं आश्वासन

Next

नवी दिल्ली-

दिल्ली सरकारनं 2022-23 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात, दिल्लीतील आप सरकारचं लक्ष रोजगार, आरोग्य, नाइट लाइफ, मार्केट, हरित ऊर्जा, रिटेल क्षेत्रावर आहे. तब्बल ७५,८०० कोटींच्या या अर्थसंकल्पात दिल्ली सरकारनं पुढील ५ वर्षांत २० लाख लोकांना नोकऱ्या देण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. दिल्ली सरकार नोकऱ्यांमध्ये ग्रीन जॉबवर भर देत आहे.

अर्थसंकल्प सादर करताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, आप सरकारचा हा आठवा अर्थसंकल्प आहे. दिल्लीत ७ वर्षात क्रांतिकारी काम झालं आहे. गेल्या वर्षी आप सरकारनं देशभक्तीपर अर्थसंकल्प सादर केला होता, यावेळी आमचा अर्थसंकल्प रोजगाराचा अर्थसंकल्प आहे. येत्या पाच वर्षांत दिल्लीतील लोकांना २० लाख नोकऱ्या देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. पुढील ५ वर्षांत किरकोळ क्षेत्रात ३ लाख नोकऱ्या आणि पुढील १ वर्षात १.२० लाखांहून अधिक नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. मनीष सिसोदिया म्हणाले की, १.५ लाख नोकऱ्या निर्माण करण्यासाठी दिल्लीच्या ५ प्रसिद्ध बाजारपेठांचा विकास केला जाईल. यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

देशाच्या जीडीपीमध्ये दिल्लीचा हिस्सा २०११-१२ मधील ३.९४ टक्क्यांवरून २०२१-२२ मध्ये ४.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. दिल्ली अर्थसंकल्प २०२२-२३ मध्ये नगरपालिका संस्थांसाठी ६,१५४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ते म्हणाले की, एम्प्लॉयमेंट मार्केट पोर्टल २.० दिल्लीत आणले जाईल. याआधीच्या फेऱ्यांमध्ये नोकऱ्या मागणारे १५ लाख आणि नोकऱ्या देणारे १० लाख लोक पुढे आले होते. या माध्यमातून दरवर्षी एक लाख नवीन रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

शिक्षण बजेट- १६,२७८ कोटी रुपये
आरोग्य- ९६६९ कोटी रुपये
परिवहन- ९५३९ कोटी रुपये

नाइट लाइफवर लक्ष
मनीष सिसोदिया यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार दिल्ली हे आगामी काळात फूड हब ओळखले जाणार आहे. नवीन फूड ट्रक पॉलिसी आणली जाणार आहे. रात्री ८ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत फूड ट्रक बसवता येतील. यामुळे दिल्लीतील नाइट लाईफ वाढेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. सरकार दिल्लीतील प्रमुख फूड हब ओळखून त्यांचा पुनर्विकास करेल.

क्लाउड किचनची संख्या दरवर्षी २० टक्क्यांनी वाढत आहे, सध्या २० हजारापेक्षा जास्त क्लाउड किचन आहेत आणि दोन लाखांहून अधिक लोकांना रोजगार आहे. हे रात्रीच्या अर्थव्यवस्थेला देखील समर्थन देते. क्लाउड किचनसाठी जागा सहजपणे उपलब्ध करुन देणे आणि परवाना देण्याची योजना आणली आहे. क्लाउड किचन उद्योग येत्या ५ वर्षात ४२,००० लोकांना रोजगार देईल. किरकोळ आणि खाद्य पेय क्षेत्र दरवर्षी २५ टक्के दरानं वाढत आहे.

गांधीनगर बनणार मोठं मार्केट
याशिवाय दिल्ली सरकार स्टार्टअप धोरण आणत आहे. या नवीन धोरणानुसार, नोकरी शोधणाऱ्या लोकसंख्येचं रूपांतर नोकरी देणाऱ्या लोकसंख्येमध्ये करण्यात येणार आहे. याशिवाय दिल्लीत नवीन इलेक्ट्रॉनिक शहर स्थापन करण्यात येणार आहे. दिल्लीत होलसेलसाठी फेस्टिव्हल आयोजित करणार असून, गांधी नगर मार्केट कपड्यांचे नवे हब बनणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय दिल्लीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही आयोजित केला जाणार आहे.

Web Title: delhi budget 2022 23 manish sisodia aap govt arvind kejriwal highlights jobs health card transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.