दिल्लीचे नवे मुख्यमंत्री २० फेब्रुवारीला घेणार शपथ, पण वेळेत बदल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 15:57 IST2025-02-18T15:56:32+5:302025-02-18T15:57:02+5:30
Delhi CM's grand oath-taking on Feb 20 : या शपथविधी सोहळ्यात ३० हजारांहून अधिक लोक सहभागी होतील आणि विशेषतः दिल्लीतील लोक या सोहळ्याचे साक्षीदार असतील.

दिल्लीचे नवे मुख्यमंत्री २० फेब्रुवारीला घेणार शपथ, पण वेळेत बदल...
Delhi CM's grand oath-taking on Feb 20 : नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. यानंतर भाजपकडून अद्याप सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता रामलीला मैदानावर होणार आहे. याआधी २० फेब्रुवारीला संध्याकाळी ४.३० वाजता होणार असे म्हटले होते. मात्र, आता वेळेत बदल करण्यात आला आहे.
हा शपथविधी सोहळा भव्य करण्यासाठी तयारी सुरू आहे. २७ वर्षांनंतर सत्तेत परतलेला भाजप शपथविधी सोहळ्याद्वारे दिल्लीतील जनतेला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे की, ते नेहमीच त्यांच्यासोबत आहेत आणि राहतील. या कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आतिशी यांनाही निमंत्रण पत्रे पाठवली जाणार आहेत. याशिवाय, एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित केले जाणार आहे.
दरम्यान, ज्या राज्यांमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि शपथविधीच्या दिवशी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, त्या राज्यांचे मुख्यमंत्री दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत, परंतु इतर सर्व एनडीए मुख्यमंत्री उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या शपथविधी सोहळ्यात ३० हजारांहून अधिक लोक सहभागी होतील आणि विशेषतः दिल्लीतील लोक या सोहळ्याचे साक्षीदार असतील. तसेच, या शपथविधी सोहळ्यात झोपडपट्टीवासीयांसह महिलांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय, अनेक व्हीव्हीआयपींनाही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जात आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपने अद्याप मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, त्याआधीच शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. २० फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता रामलीला मैदानावर शपथविधी समारंभात होणार असल्यामुळे संपूर्ण मैदानावर रेड कार्पेट अंथरले जाईल, असे सांगितले जात आहे.