मणिपूर जळतंय पण पंतप्रधान लपून बसले आहेत, जनता त्यांना शोधतेय - अरविंद केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 01:59 PM2023-07-24T13:59:33+5:302023-07-24T14:00:21+5:30
manipur violence news : हिंसाचाराच्या आगीने जळत असलेले मणिपूर राज्य सध्या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.
arvind kejriwal on modi : मागील दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळणाऱ्या मणिपूरमधील क्रूरतेने पुन्हा एकदा डोकं वर काढलं. विवस्त्र अवस्थेत महिलांची धिंड काढल्याने देशभर संतापाची लाट उसळली आहे. महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढून दहशत माजवणाऱ्या नराधमांना मणिपूर पोलिसांनी अटक केली असली तरी देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केले आहे, तर राजकारण न करण्याचे आवाहन सत्ताधारी करत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याचाच दाखला देत पंतप्रधाननरेंद्र मोदींवर टीका केली.
मणिपूरमध्ये हिंसाचार टोकाला पोहचला आहे. आतातरी पंतप्रधाननरेंद्र मोदींनी समोर यायला हवं आणि भाष्य करायला हवं. मणिपूर जळत आहे, मग जनतेने कुठे जायला हवं. त्यामुळे पंतप्रधानांनी समोर येऊन बोलायला पाहिजे. पंतप्रधान का लपले आहेत, त्यांना जनता शोधत आहे, अशा शब्दांत केजरीवालांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. ते माध्यमांशी बोलत होते.
मणिपूरमध्ये हिंसाचाराची आग
ईशान्येकडील राज्य असलेल्या मणिपूरमधील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. यासंदर्भात गृहमंत्री, अमित शाह यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यासोबत चर्चा केली होती. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यास शहांनी सांगितले.
दरम्यान, मणिपूरमध्ये अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा मिळावा यासाठी मैतेई समुदायाच्या मागणीला विरोध करण्यासाठी ३ मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मार्च' आयोजित केल्यानंतर हिंसाचार सुरु झाला होता. राज्याच्या लोकसंख्येपैकी ५३ टक्के असलेला मैतेई समुदाय प्रामुख्याने इंफाळ खोऱ्यात राहतो. तर नागा आणि कुकी सारख्या आदिवासी समुदायांची लोकसंख्या ४० टक्के आहे आणि ते प्रामुख्याने डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.