मतदान झाल्यावर लगेच ठरला दिल्लीचा मुख्यमंत्री; रेखा गुप्ता यांचे नाव प्रथमपासूनच आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 10:28 IST2025-02-21T10:27:39+5:302025-02-21T10:28:31+5:30
भाजपने हा विचार पक्का केला. त्याचे दृश्य स्वरूप म्हणजे रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली.

मतदान झाल्यावर लगेच ठरला दिल्लीचा मुख्यमंत्री; रेखा गुप्ता यांचे नाव प्रथमपासूनच आघाडीवर
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांत विजय मिळाल्यास महिला नेत्याला मुख्यमंत्री करायचे असा निर्णय भाजपने ५ फेब्रुवारीला मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही वेळातच घेतला. महिला सबलीकरणासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे कृतीतून दाखविणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे. त्यानुसार भाजपने हा विचार पक्का केला. त्याचे दृश्य स्वरूप म्हणजे रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली.
यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रिपदी निवड करावी, असा निर्णय एकमताने भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला भाजप आमदार, तसेच भाजप नेते रविशंकर प्रसाद, दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव व अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर रेखा गुप्ता यांनी नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची भेट घेऊन राज्य सरकार स्थापनेचा दावा केला. दिल्ली विधानसभा निवडणुकांचे मतदान संपल्यानंतर भाजप नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत मुख्यमंत्रिपदासाठी रेखा गुप्ता यांचे नाव आघाडीवर होते. या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरदेखील त्यांच्याच नावाला प्राधान्य देण्यात येत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपच्या अन्य वरिष्ठ नेत्यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, गुप्ता यांच्या नावाबद्दल मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या प्रवेश वर्मा, सतीश उपाध्याय, विजेंद्र गुप्ता या भाजप नेत्यांशी पक्षाच्या निरीक्षकांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यांची मते विचारात घेऊन गुप्ता यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करण्यात आले.
प्रवेश वर्मा यांनीच सुचविले रेखा गुप्ता यांचे नाव
मंत्रिमंडळात जाट, शीख, मागासवर्गीय, पूर्वांचली गट या साऱ्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल याची काळजी घेण्याचे भाजपने ठरविले आहे. विधिमंडळ नेतेपदासाठी रेखा गुप्ता यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या प्रवेश वर्मा यांनीच सुचविले.
त्याला सतीश उपाध्याय, वीजेंद्र गुप्ता या भाजप नेत्यांनी अनुमोदन दिले. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर ११ दिवसांनी मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे नाव भाजपने जाहीर केले.