शाळेत सहावीच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 14:08 IST2024-12-05T14:07:57+5:302024-12-05T14:08:58+5:30
गुरुवारी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

शाळेत सहावीच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
नवी दिल्ली : दिल्लीतील वसंत विहार येथील चिन्मय शाळेत सहावीत शिकणाऱ्या एका १२ वर्षीय विद्यार्थ्याचा मंगळवारी (३ डिसेंबर) संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेप्रकरणी आज मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
गुरुवारी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यासोबतच दोन पद्धतीचा तपास करण्याचेही आदेश दिले आहेत. दरम्यान, पोलीस ज्याप्रकारे घाईघाईने वागत आहेत, त्यावरून ते आरोपींना वाचवत असल्याचा आरोप मुलाचे वडील सागर यांनी केला आहे.
मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, दोन दिवसांपूर्वी वसंत विहार येथील शाळेत विद्यार्थ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. हे संशयास्पद प्रकरण आहे, असे काय घडलं, ज्यामुळं मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. शाळेच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला असेल तर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. सीसीटीव्ही उपलब्ध आहेत. आम्ही दोन प्रकारच्या तपासाचे आदेश दिले आहेत. शाळेच्या भूमिकेची शिक्षण विभाग चौकशी करणार आहे. तर विद्यार्थ्याला रुग्णालयात नेण्यात काही विलंब झाला का? हे पाहण्यासाठी एसडीएमकडून दुसरी चौकशी केली जाईल. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री आतिशी यांनी सांगितले.
याचबरोबर, असे काय घडत आहे की, सहावीच्या वर्गातील मुले एवढ्या हिंसकपणे मारामारी करत आहेत? याची चौकशी करावी लागेल, त्यासाठी दिल्लीतील सर्वांना एकत्र यावे लागेल. आज मुलं रोज हिंसाचाराच्या बातम्या पाहत आहेत. संपूर्ण समाजात गुन्ह्यांच्या बातम्या येत आहेत. याचा परिणाम मुलांवर होत आहे, असेही मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या.
पोलीस आरोपींना वाचवत आहेत - वडिलांचा आरोप
याप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांवर आरोप केला आहे. ते म्हणाले की, शाळा आणि पाच मुलांना वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत, असा आम्हाला संशय आहे. मुलं त्याचा गळा दाबत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. १०-११ वीच्या एका मुलानं येऊन त्याचा गळा आवळून खून केला होता. तसेच, त्या दिवशीही पोलिसांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार घाईघाईने करण्यास सांगितले. यासाठी काल सकाळी पोलिसांनी घाईघाईने बळाचा वापर केला आणि लाठीचार्जही झाला.