"सत्येंद्र जैन देशभक्त, त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केलं जावं"; अरविंद केजरीवालांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 06:45 PM2022-06-01T18:45:41+5:302022-06-01T18:47:41+5:30
Arvind Kejariwal And Satyendar Jain : सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. हवाला केस प्रकरणी सत्येंद्र जैन यांची ईडीकडून याआधीपासूनच चौकशी सुरू होती.
नवी दिल्ली - सत्येंद्र जैन हे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमध्ये आरोग्य, उद्योग, ऊर्जा, गृह, शहरी विकास आणि पाणी मंत्री आहेत. सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. हवाला केस प्रकरणी सत्येंद्र जैन यांची ईडीकडून याआधीपासूनच चौकशी सुरू होती. ईडीने 5 एप्रिल रोजी कारवाई करत त्यांची 4.81 कोटी रुपयांची संपत्ती देखील जप्त केली होती. आता अटकेची कारवाई झाल्याने केजरीवाल सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. यानंतर आता अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन हे देशभक्त आहेत. तसेच मोहल्ला क्लिनिक मॉडेलचे शिल्पकार म्हणून त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले जावे, अशी मागणी केली आहे. "सत्येंद्र जैन यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत. सगळ्यांना त्याची चौकशी करू द्या. सीबीआयने त्याची चौकशी करून त्याला क्लीन चिट दिली आहे. आता ईडी लवकरच त्यांना सर्व आरोपातून मुक्त करेल. जैन यांनी मोहल्ला क्लिनिक आणून एक आदर्श ठेवला आहे, त्यांचे काम पाहण्यासाठी बाहेरून लोक येतात. त्यांना पद्मविभूषण देण्यात यावे" असं म्हटलं आहे.
सध्या सर्वजण सत्येंद्र जैन यांच्यावर निशाणा साधत आहेत पण ते लवकरच यातून बाहेर येतील असं देखील केजरीवाल यांनी म्हटलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. सत्येंद्र जैन यांना अटक केल्यानंतर ते मंत्रिपदावर कायम राहण्याबाबत प्रश्न उपस्थित करत स्मृती इराणी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. तसेच, काळ्या पैशाचे मालक सत्येंद्र जैन यांना केजरीवाल का वाचवत आहेत? असा सवाल स्मृती इराणी यांनी केला आहे.
स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, भ्रष्टाचार म्हणजे देशाशी विश्वासघात, मग तुम्ही देशाच्या गद्दारांना आश्रय देत आहात का? न्यायालयाने सत्येंद्र जैन यांची भूमिका जाहीर केल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही का? 2019 मध्ये न्यायालयाने हा आदेश दिला होता, आजवर सत्येंद्र जैन यांच्याकडे काळा पैसा असल्याचे अरविंद केजरीवाल यांना माहीत होते, तरीही अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही? सत्येंद्र जैन यांचा घोटाळा ही अरविंद केजरीवालांची मजबुरी आहे का? दिल्ली उच्च न्यायालय हा राजकीय पक्ष आहे का?, असे सवाल करत स्मृती इराणी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला.