Coronavirus Lockdown : दिल्लीत कोरोनाचा कहर; आज रात्रीपासून २६ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 01:47 PM2021-04-19T13:47:22+5:302021-04-19T13:49:50+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. २६ एप्रिल सकाळपर्यंत लागू राहणार लॉकडाऊन.
गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूनं पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत देशातील अनेक राज्यांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतही कोरोनाबाधितांची विक्रमी नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपराज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पार पडलेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
सोमवारी (आज) रात्री १० वाजल्यापासून ते २६ एप्रिल सकाळपर्यंत हा लॉकडाऊन लागू राहणार आहे. या दरम्यान, विनाकारण बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच वीकेंड लॉकडाऊनसारखेच यावेळी निर्बंध असतील. एका आठवड्याच्या या लॉकडाऊनदरम्यान दिल्लीत कठोर निर्बंध लागू केले जाणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी असेल. तसंच सर्व खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम करण्याचे निर्देश देण्यात आले असून सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही अर्धी असेल.
रुग्णालयांमधघ्ये, मेडिकल स्टोअरमध्ये आणि लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना यातून सूट देण्यात आली आहे. याशिवाय रेल्वे स्थानक, विमानतळ, बस स्थानकांवर जाणाऱ्यांनाही सूट देण्यात आली आहे. मेट्रो, बस सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून यात केवळ ५० टक्के क्षमतेनं प्रवाशांना प्रवास करता येईल. तसंच दिल्लीतील बँका, एटीएम, पेट्रोल पंप खुली राहतील. याशिवाय सर्व थिएटर्स, ऑडिटोरिअम, स्पा, जिम, स्विमिंग पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या लोकांच्या लग्नाच्या तारखा यापूर्वीच ठरल्या आहेत त्यांना केवळ ५० जणांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली असून यासाठी इ-पास बंधनकारक करण्यात आले आहेत.
दिल्ली में 6 दिन का LOCKDOWN!
— AAP (@AamAadmiParty) April 19, 2021
मैंने और LG साहब ने परिस्थितियों का जायजा लेने के बाद निर्णय लिया है कि दिल्ली में आज रात 10 बजे से अगले सोमवार को 5 बजे तक 6 दिन का LOCKDOWN रहेगा।
Essential Services ज़ारी रहेगी, थोड़ी देर में Detailed Order जारी किया जायेगा।- CM @ArvindKejriwalpic.twitter.com/dZ6N6ZYmtQ
आयकार्ड दाखवून प्रवास
याशिवाय अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांना आयकार्ड दाखवल्यानंतरच प्रवासाची परवानगी दिली जाईल. तसंच एका राज्यातून दुसऱ्या राज्यांतमध्ये जाणारी सार्वजनिक वाहतूकही सुरू ठेवण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच कोणत्याही स्टेडियममध्ये विना स्पर्धकच सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जनतेचं सहकार्य आवश्यक
"या लढाईत जनतेचं सहकार्य आवश्यक आहे. आम्ही प्रत्येक गोष्ट जनतेसमोर ठेवली आघे. दिल्लीत आज सर्वाधित चाचण्या होत आहेत. दररोज चाचण्यांची संख्या वाढवली जात आहे. दिल्ली सरकारनं आजवर आकडेवारी लपवली नाही. दिल्लीत किती बेड्स उपलब्ध आहेत, आयसीयू बेड्स आणि रुग्णालयांची स्थिती याबद्दलही माहिती दिली आहे," असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. "सध्या दिल्लीत दररोज २५ हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. दिल्लीत बेड्सची कमतरता आहे. दिल्लीत औषधांची कमतरता असून पुरेसा ऑक्सिजनही नाही. दिल्लीतील आरोग्य यंत्रणा अधिक रुग्णसंख्या घेऊ शकणार नाही. यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे," असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.