“आता जनकल्याणाचा मार्ग निवडला आहे, मग तुरुंगात तर जावेच लागेल”: अरविंद केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 10:07 AM2024-01-01T10:07:08+5:302024-01-01T10:07:48+5:30
AAP Chief Delhi CM Arvind Kejriwal News: गेल्या ७५ वर्षांत अन्य पक्षांना जमले नाही, ते आम आदमी पार्टीने करून दाखवले, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
AAP Chief Delhi CM Arvind Kejriwal News ( Marathi News ): गेल्या १० वर्षांत १३५० राजकीय पक्षांमध्ये आम आदमी पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आला. आम्ही आमचा स्वतंत्र पक्ष काढला. जर आपण त्या १३५० राजकीय पक्षांप्रमाणे यशस्वी झालो नसतो आणि काही चांगले केले नसते तर आज आपल्या पक्षाचा एकही नेता तुरुंगात गेला नसता. आज प्रत्येकाच्या घरात आणि कुटुंबात आनंद साजरा होत असता. मात्र, जनतेचा हिताचा, लोककल्याणाचा मार्ग निवडला आहे, मग त्यासाठी तुरुंगात जावेच लागेल, असे विधान आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक परिषद झाली. यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी पक्षाची वाटचाल सांगताना विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी केलेल्या प्रदीर्घ संबोधनात केजरीवाल म्हणाले की, दोन मोठ्या पक्षांनी या देशावर ७५ वर्षे राज्य केले आहे, ते इतक्या सहजासहजी सत्ता सोडणार नाहीत. आपल्याला संघर्ष करत राहायचा आहे. आपल्याला दुःखी होण्याची गरज नाही. तुरुंगात असलेले आमचे पाच नेते हिरो आहेत. आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे. वकिलांच्या सतत संपर्कात आहे. तुरुंगात राहणारे आमचे सर्व नेते खचलेले नाहीत, ही खूप चांगली गोष्ट आहे. ज्या दिवशी मनीष सिसोदिया यांचा जामीन रद्द करण्यात आला, त्याच दिवशी सिसोदिया यांनी एक संदेश पाठवला. त्यात, जेवढा काळ तुरुंगात ठेवतील, त्याला काही अडचण नाही. हे संपूर्ण प्रकरण खोटे असून माझा लढा सुरूच राहणार आहे.
गेल्या १२ वर्षांत आम आदमी पक्षाने करून दाखवले
आम आदमी पक्षाने गेल्या १२ वर्षात अभूतपूर्व यश मिळवले. जे काम इतर पक्ष ७५ वर्षांतही करू शकले नाहीत, ते काम आम्ही केले आहे. पक्षाने राष्ट्रीय राजकारणात अतिशय प्रभावी कामगिरी करून दाखवली आहे. देशात प्रथमच शाळा-हॉस्पिटलच्या प्रश्नांवर बोलणे विरोधकांना भाग पडले आहे. या लोकांनी आमचा गॅरंटी हा शब्द जाहीरनामासह चोरला आहे. आता हे लोकही “मोदींची गॅरंटी” आणि “काँग्रेसची गॅरंटी” म्हणू लागले आहेत. या लोकांनी जनतेला आश्वासने दिली, पण त्यांची पूर्तता कोणीही केली नाही. कारण त्यांचा हेतू चांगला नाही. आम्ही आमच्या सर्व आश्वासनांची पूर्तता करीत आहोत. मुलांना चांगले शिक्षण आणि गरिबांना मोफत उपचार देण्याचे बोलले तर तुरुंगात जावे लागेल आणि त्यासाठी आम्हाला तयार राहावे लागेल, असे सूतोवाच अरविंद केजरीवाल यांनी केले.
दरम्यान, देशभरात संघटना वाढवणे आणि मजबूत करणे खूप महत्त्वाचे आहे. मजबूत संघटनेशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत. पक्ष संघटना बांधण्यासाठी प्रत्येकाला आपापल्या राज्यात कठोर परिश्रम करावे लागतील. लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष इंडिया आघाडीचा एक भाग आहे. जागावाटपामध्ये ज्या काही जागा मिळाल्या, त्या निवडणुका चांगल्या पद्धतीने लढवायच्या आहेत. त्या सर्व जागा जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचा आहे. आम आदमी पार्टी लोकसभा निवडणूक लढवत नाही, त्या राज्यांतील पक्षाचे स्वयंसेवक येऊन जिथे निवडणूक लढवतील तिथे मदत करतील. लोकसभेनंतर हरियाणा विधानसभा निवडणूक आपल्या पक्षासाछी सर्वांत मोठी निवडणूक आहे. आम आदमी पार्टी हरियाणा विधानसभा निवडणूक सरकार स्थापन करण्याच्या इराद्याने लढणार असून, त्यासाठी सर्व ताकद पणाला लावू, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.