“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 10:00 AM2024-05-27T10:00:15+5:302024-05-27T10:01:08+5:30

Arvind Kejriwal Petition in Supreme Court: २ जून रोजी अरविंद केजरीवाल यांना पुन्हा तिहार तुरुंगात परतावे लागणार असून, तत्पूर्वी अंतरिम जामीन वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

delhi cm arvind kejriwal new petition in supreme court seeks to extend interim bail time to seven days | “अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती

“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती

Arvind Kejriwal Petition in Supreme Court: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. २ जून रोजी त्यांना पुन्हा तिहार तुरुंगात परतावे लागणार आहे. मात्र, यातच आता अरविंद केजरीवाल यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात एक नवीन याचिका दाखल करण्यात आली असून, यामध्ये अंतरिम जामिनाची मुदत सात दिवसांनी वाढवून मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

दिल्ली मद्य धोरण प्रकरणी केजरीवाल यांना ईडीनकडून अटक झाली होती. प्रचार करण्याचा मौलिक, घटनात्मक किंवा कायदेशीर अधिकार नसल्याने केजरीवाल यांना अंतरिम जामीन देता येणार नाही, हा ईडीचा दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. सर्वोच्च न्यायालयाने सशर्त अंतरिम जामीन मंजूर करताना, अरविंद केजरीवाल यांच्या प्रचार करण्यावर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. मात्र, उपराज्यपालांच्या संमतीशिवाय ते फायलींवर स्वाक्षरी करणार नाहीत, मुख्यमंत्री कार्यालयात जाणार नाहीत आणि मंत्रिमंडळाच्या बैठकींमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. यानंतर आता अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात नवीन याचिका दाखल केली आहे. 

सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत काय म्हटले आहे?

अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. यामध्ये अंतरिम जामीन आणखी सात दिवस वाढवण्याची मागणी केली आहे. याचे कारण स्पष्ट करताना अरविंद केजरीवाल यांच्यावतीने सांगण्यात आले आहे की, पीईटी आणि सीटी स्कॅनशिवाय त्यांना आणखी काही चाचण्या कराव्या लागणार आहेत. या सर्व तपासासाठी त्यांनी सात दिवसांचा अवधी मागितला आहे. त्यामुळे अंतरिम जामिनाची मुदत वाढवून मिळावी, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यावर अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्याने दिल्लीत राजकीय वातावरण तापले. आम आदमी पार्टी केजरीवाल यांच्या सुटकेला मोठा विजय म्हणून दाखवले. अरविंद केजरीवाल यांनी बाहेर येताच रॅली, मुलाखती, सभांना संबोधित करत जोरदार प्रचार केला. यावेळी भाजपावर सडकून टीका केली. तसेच केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास पहिल्या दोन महिन्यांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविले जाईल आणि वर्षभरानंतर अमित शाह पंतप्रधान होतील, अशी भविष्यवाणी अरविंद केजरीवाल यांनी वर्तविली. 
 

Web Title: delhi cm arvind kejriwal new petition in supreme court seeks to extend interim bail time to seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.