अरविंद केजरीवालांची तब्येत बिघडली; स्वत:ला केलं आयसोलेट, कोरोना टेस्ट होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 01:05 PM2020-06-08T13:05:58+5:302020-06-08T13:13:51+5:30
रविवारी (दि.7) दुपारपासून अरविंद केजरीवाल यांनी आपल्या बैठका रद्द केल्या आहेत. तसेच, ते कोणालाही भेटले नसून त्यांनी स्वत: ला आयसोलेट केले आहे.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडल्याचे समजते. कालपासून अरविंद केजरीवाल यांना ताप आणि खोकल्याच्या त्रास जाणवत आहे. त्यामुळे त्यांची आता कोरोना टेस्ट सुद्धा करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.
रविवारी (दि.7) दुपारपासून अरविंद केजरीवाल यांनी आपल्या बैठका रद्द केल्या आहेत. तसेच, ते कोणालाही भेटले नसून त्यांनी स्वत: ला आयसोलेट केले आहे. दरम्यान, रविवारीच दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की, दिल्लीतील सरकारी किंवा खाजगी रुग्णालये असोत, त्याठिकाणी फक्त दिल्लीकरांवरच उपचार केले जातील. तसेच, दिल्लीबाहेरील लोकांवर फक्त केंद्राच्या रुग्णालयात उपचार केले जातील.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत: याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. दिल्ली सरकारला डॉक्टर महेश वर्मा कमिटीने यासंदर्भातील सूचना दिल्या होत्या. यानंतर दिल्ली सरकारने या सूचनांवर दिल्लीतील लोकांकडून त्यांचे मत जाणून घेतले. त्यानंतर फक्त दिल्लीतील लोक दिल्लीच्या सरकारी रुग्णालयात उपचार घेतील, असा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे.
दरम्यान, दिल्लीत आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 27 हजार 654 आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1320 नवे रुग्ण आढळले. तर आतापर्यंत कोरोनामुळे 761 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत सध्या 219 कंटेनमेंट झोन आहेत. दिल्लीत 1 जूननंतर दररोज 1200 हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याचे समोर येत आहे.