अरविंद केजरीवाल आज तिहार तुरुंगातून बाहेर येणार? 'या' अटींचे पालन करावे लागणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 09:34 AM2024-06-21T09:34:27+5:302024-06-21T09:35:27+5:30
Arvind Kejriwal : गुरुवारी विशेष न्यायाधीश निया बिंदू यांनी अरविंद केजरीवाल यांना १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर दिलासा दिला.
नवी दिल्ली : : मद्य धोरण प्रकरणी उद्भवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने गुरुवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. या आदेशाला ४८ तासांसाठी स्थगिती देण्याची सक्त वसुली संचालनालयाची (ईडी) विनंतीही न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे शुक्रवारी म्हणजेच आज अरविंद केजरीवाल हे तिहार तुरुंगातून बाहेर येऊ शकतात.
गुरुवारी विशेष न्यायाधीश निया बिंदू यांनी अरविंद केजरीवाल यांना १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर दिलासा दिला. अरविंद केजरीवाल यांच्या नियमित जामिनासाठीच्या अर्जावर फिर्यादी व बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी हा आदेश दिला. तसेच, अरविंद केजरीवाल यांना जामीन देताना न्यायालयाने त्यांच्यावर अनेक अटीही घातल्या आहेत. यामध्ये ते तपासात अडथळा आणण्याचा किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणार नाही. तसेच, विशेष न्यायाधीशांनी अरविंद केजरीवाल यांना आवश्यक असेल, तेव्हा न्यायालयात हजर राहून तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
अरविंद केजरीवाल आज तिहार तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता असल्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर आपने म्हटले होते की, सत्याला त्रास दिला शकतो, पराभव होऊ शकत नाही. दरम्यान, तिहार तुरुंग प्रशासनाला न्यायालयाचा आदेश मिळाल्यानंतर आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची शुक्रवारी दुपारपर्यंत सुटका होऊ शकते.
गुरुवारी रात्री उशिरापर्यंत तिहार प्रशासनाला जामीन आदेश मिळालेला नव्हता. तुरुंगाच्या नियमांनुसार, न्यायालयाने आदेश दिल्यावर न्यायालयाचे कर्मचारी ते तिहार मुख्यालयात आणतात आणि केंद्रीय जनसंपर्क कार्यालयाकडे सोपवतात. ही सर्व कागदपत्रे आज पूर्ण होणार आहेत. यानंतर अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर येऊ शकतात. दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल नेमकं काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.