“अरविंद केजरीवाल यांना औषधे दिली जात नाहीत, जेलमध्येच मारण्याचे...”: सुनीता केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 06:56 PM2024-04-21T18:56:57+5:302024-04-21T19:00:07+5:30
Sunita Kejriwal News: इंडिया आघाडीच्या रॅलीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी मोठे आरोप केले.
Sunita Kejriwal News: अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सर्वोत्तम काम करून दाखवले आहे. अरविंद केजरीवाल यांचा काय दोष आहे, त्यांना का जेलमध्ये टाकले आहे, असा सवाल करत अरविंद केजरीवाल यांना योग्य प्रकारे औषधे दिली जात नाहीत. त्यांना जेलमध्येच मारण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असा मोठा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी केला.
झारखंडची राजधानी रांची येथे इंडिया आघाडीची महारॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत सहभागी होत सुनीता केजरीवाल यांनी मोठे आरोप करत जोरदार टीका केली. अरविंद केजरीवाल यांच्या आधी हेमंत सोरेन यांनाही जेलमध्ये टाकले. अरविंद केजरीवाल यांना आयआरएसची नोकरी मिळाली होती. मात्र, समाजसेवा करण्याचे त्यांच्या मनात होते. २००६ मध्ये अरविंद केजरीवाल यांनी नोकरी सोडली आणि समाजसेवा करू लागले. २०११ मध्ये झालेले आंदोलन सर्वांना माहिती आहे. जनतेला हक्क मिळवून देण्यासाठी दोनवेळा दीर्घ उपोषण केले. त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. डॉक्टरांनी उपोषण न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, जनतेच्या हक्कासाठी त्यांनी डॉक्टरांचे ऐकले नाही. जीवावर उदार होऊन जनहक्कासाठी लढले. ते आपल्या तत्त्वांचे पक्के आहेत. त्यांना सत्तेचा मोह नाही. त्यांना फक्त देशसेवा करायची आहे, असे सुनीता केजरीवाल यांनी संबोधित करताना सांगितले.
भाजपाविरोधात पक्ष लढा देत आहेत
हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आम्ही आलो आहोत. पंतप्रधान मोदींना सांगू इच्छितो की, संपूर्ण आदिवासी समाज तुमच्या विरोधात आहे. भाजपाचा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास नाही. तर नागपूरच्या संविधानावर आहे. संविधान वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. भाजपाचा ४०० पारचा दावा आहे. हुकूमशाहीविरुद्धच्या लढाईत संपूर्ण देश, संपूर्ण इंडिया आघाडी एकत्रितपणे उभी आहे. देश आणि संविधान वाचवण्यासाठी लढत आहोत, अशी टीका आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केली.
दरम्यान, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनीही सडकून टीका केली. हेमंत सोरेन यांनी तुरुंगातून संदेश दिला आहे की, आम्ही संविधान नष्ट होऊ देणार नाही. जनतेने एनडीएला दोनदा निवडून दिले, पण राज्यात एनडीएला स्थान दिले नाही. एनडीएला राज्य काबीज करायचे आहेत. काही ठिकाणी आमदारांना विकत घेतले जाते, तर काही ठिकाणी नेत्यांना अटक केली जात आहे. हेमंत सोरेन अडीच महिन्यांपासून तुरुंगात आहे. अरविंद केजरीवाल यांच्याबाबतही असेच घडले आहे. निवडणुकीपूर्वी नेते आणि मुख्यमंत्र्यांना तुरुंगात डांबले जात आहे, या शब्दांत कल्पना सोरेन यांनी हल्लाबोल केला.