'त्या' सगळ्या डॉक्टरांना भारतरत्न द्या; अरविंद केजरीवालांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 11:32 PM2021-07-04T23:32:54+5:302021-07-04T23:35:15+5:30
कोरोना संकटात रुग्णसेवा करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना भारतरत्न देण्याची मागणी
नवी दिल्ली: कोरोना संकट काळात देशातील जनतेची सेवा करणाऱ्या सर्व डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भारतरत्न देण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना रविवारी पत्र लिहिलं. कोरोनाशी दोन हात करताना आपला जीव गमावणाऱ्यांसाठी हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असंदेखील केजरीवाल यांनी पत्रात नमूद केलं आहे.
'कोरोना संकटाशी मुकाबला करताना अनेक डॉक्टर आणि नर्सेसनी जीव गमावला. आपण भारतरत्न पुरस्कारानं त्यांचा सन्मान केल्यास ती त्यांच्यासाठी अतिशय योग्य श्रद्धांजली असेल. लाखो डॉक्टर आणि नर्सेसनी त्यांचं आयुष्य आणि कुटुंबाची चिंता न करता निस्वार्थ भावनेनं लोकांची सेवा केली. भारतरत्नच्या माध्यमातून त्यांचा यथोचित सन्मान होईल,' असं केजरीवाल यांनी पत्रात म्हटलं आहे.
वैद्यकीय क्षेत्राला भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करायचं असल्यास त्यासाठी नियमांमध्ये आवश्यक बदल करावे लागतील. ते करण्यात यावेत, अशीही मागणी केजरीवालांनी केली आहे. 'एका समूहाला भारतरत्न देण्याचा नियम नसल्यास नियमांमध्ये बदल करण्यात यावेत. संपूर्ण देशाच्या मनात डॉक्टरांबद्दल कृतज्ञतेची भावना आहे. डॉक्टरांचा भारतरत्न पुरस्कारानं गौरव झाल्यास देशातील प्रत्येक नागरिकाला आनंद होईल,' अशा भावना केजरीवालांनी पत्रातून व्यक्त केल्या आहेत.