केजरीवालांचा पुन्हा सॉफ्ट हिंदुत्वाचा फाॅर्म्युला; कोरोनाबाधितांसाठी योग अन् प्राणायामाचे वर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 09:05 AM2022-01-12T09:05:01+5:302022-01-12T09:05:17+5:30
केजरीवाल यांनी घोषणा केली असून, योग व प्राणायमामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढत असल्याचा दावा केला आहे.
नवी दिल्ली : दिल्ली महापालिकांची निवडणूक काही महिन्यांवर आली असताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सॉफ्ट हिंदुत्वाचा फाॅर्म्युला अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत होम क्वारंटाइन असलेल्या ४० हजार कोरोनाबाधितांना योग व प्राणायामाचे मोफत ऑनलाइन वर्ग आयोजित केले जाणार आहेत.
यासंदर्भात केजरीवाल यांनी घोषणा केली असून, योग व प्राणायमामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढत असल्याचा दावा केला आहे. या दिल्लीतील नागरिकांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला आहे. लोकांना योग व प्राणायमाचा निश्चितपणे फायदा होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
हनुमान चालिसानंतर प्राणायम
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम राबविला होता. याचा राजकीय फायदा आम आदमी पार्टीला मिळाल्याचे बोलले जाते. त्यावेळी सॉफ्ट हिंदुत्वाचा आरोप मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या राजकीय विरोधकांनी केला होता.