दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? 'हे' १३ जण ठरवणार... जाणून घ्या, कधी नाव घोषित केलं जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 03:01 PM2024-09-16T15:01:50+5:302024-09-16T15:02:49+5:30
Delhi Politics: दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? सध्या या प्रश्नावर सस्पेन्स कायम आहे.
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यानंतर दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? सध्या या प्रश्नावर सस्पेन्स कायम आहे. एकीकडे राजकीय वर्तुळात 'आप'च्या जवळपास पाच बड्या नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे नव्या मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीसाठी कोण-कोण निर्णय घेणार हेही समोर आले आहे.
सूत्रांनी सोमवारी (दि.१६ ) 'एबीपी न्यूज'ला माहिती दिली की, 'आप'च्या पॉलिटिकल अफेयर्स कमेटीची (पीएसी) बैठक संध्याकाळी सिव्हिल लाइन्स येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणार आहे. या बैठकीत जे नाव निश्चित केले जाईल ते एक दिवसानंतर म्हणजे मंगळवारी (दि.१७) आपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ठेवण्यात येईल आणि त्यानंतर नाव घोषित केलं जाईल.
आपच्या PAC सदस्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत, जे विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीची भूमिका बजावतील.....
- अरविंद केजरीवाल
- भगवंत मान
- मनीष सिसोदिया
- संजय सिंह
- संदीप पाठक
- गोपाल राय
- आतिशी
- एनडी गुप्ता
- दुर्गेश पाठक
- पंकज गुप्ता
- राघव चड्ढा
- इमरान हुसैन
- राखी बिडलान
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 'ही' नावं आघाडीवर
- आतिशी
- सौरभ भारद्वाज
- राघव चड्ढा
- गोपाल राय
- कैलाश गहलोत
- सुनीता केजरीवाल
केजरीवालांची राजीनामा देण्याची घोषणा
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दोन दिवसांपूर्वी कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाला. यानंतर काल अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर काल अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील आप आदमी पार्टीच्या (आप) मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी, दोन दिवसांनी मी मुख्यमंत्रीपद सोडणार आहे. निवडणुकीनंतर मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसेन, माझ्या जागी दुसरे मुख्यमंत्री असतील, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. यानंतर आता राजकीय वर्तुळात दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.