ट्विटरची अडचण आणखी वाढली! MD मनीष माहेश्वरी यांच्या विरोधात तक्रार दाखल; असं आहे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 07:32 AM2021-07-04T07:32:03+5:302021-07-04T07:35:18+5:30
पोलिसांनी तक्रारीनंतर तपासाला सुरुवात केली आहे आणि लवकरच याप्रकरणी एफआयआर नोंदवली जाऊ शकते.
नवी दिल्ली - नव्या आयटी नियमांवरून सरकारसोबत वाद सुरू असलेल्या ट्विटरच्या अडचणी सातत्याने वाढतच चालल्या आहेत. गाझियाबाद येथे एका वृद्धाला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कायद्याच्या कचाट्यात सापडलेले ट्विटर इंडियाचे एमडी आणखी एका अडचणीत अडकले आहेत. ट्विटर इंडियाचे एमडी मनीष माहेश्वरींविरोधात दिल्ली येथे आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सांगण्यात येते, की धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी आणि एका संस्थेविरोधात दिल्ली पोलीस सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तत्पूर्वी गाझियाबाद येथे वृद्धाला जालेल्या मारहाणीचा व्हिडिओ आणि भारताच्या वादग्रस्त नकाशासंदर्भातील प्रकरणावरून ट्विटर विरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे. गाझियाबाद प्रकरणात तर ट्विटरच्या एमडींना नोटीसही जारी करण्यात आली आहे आणि आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे.
ट्विटरचे मनीष माहेश्वरी यांच्यावर गुन्हा दाखल; काश्मीर भारताबाहेर दाखवल्याचा ठपका
अॅव्होकेट आदित्यसिंह देशवाल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की ट्विटर कम्युनिकेशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ट्विटर इंडियाचे एमडी मनीष माहेश्वरी आणि ट्विटर इंडियाचे सार्वजनिक धोरण व्यवस्थापक शगुफ्ता कामरान यांच्या शिवाय रिपब्लिक एथेइस्टचे संचालक आणि सीईओ आर्मिन नवाबी आणि सुजाना मॅकिन्ट्री यांच्या विरोधातही एफआयआर नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे.
लवकरच नोंदवली जाऊ शकते एफआयआर -
देशवाल यांनी हिंदू देवीच्या फोटोसंदर्भातील एका पोस्टचा हवाला देताना म्हटले आहे, की ट्विटर युझर्सनी केलेली ही पोस्ट केवळ अपमानास्पदच नाही, तर समाजात शत्रुत्व आणि द्वेष पसरवणारीही आहे. पोलिसांनी तक्रारीनंतर तपासाला सुरुवात केली आहे आणि लवकरच याप्रकरणी एफआयआर नोंदवली जाऊ शकते.