आले भीक मागायला! संचारबंदीत कार रोखताच महिलेचा पोलिसांशी वाद; VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 10:34 AM2021-04-19T10:34:28+5:302021-04-19T10:35:44+5:30
मास्क का घातली नाही, अशी विचारणा करताच महिलेनं पोलिसांशी घातली हुज्जत
नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे जवळपास पावणे तीन लाख नवे रुग्ण आढळून आले. दोन आठवड्यांपूर्वी देशात पहिल्यांदा एका दिवसात १ लाख नवे रुग्ण आढळून आले. त्यानंतर अवघ्या १० दिवसांत हा आकडा २ लाखांवर पोहोचला. लवकरच तो तीन लाखापर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र, दिल्लीसह उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शक्य असल्यास घरात थांबा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क घाला, असं आवाहन गेल्या वर्षभरापासून करण्यात येत आहे. मात्र तरीही अनेकांना नियमांचं महत्त्व समजलेलं नाही.
देशाची राजधानी दिल्लीत एका दाम्पत्याची कार वीकेण्ड लॉकडाऊन दरम्यान रोखण्यात आली. पोलिसांनी कार अडवताच महिलेनं वाद घालण्यास सुरुवात केली. माझे वडीलदेखील पोलीस आहेत. पावती फाडूनच दाखवा, अशी अरेरावीची भाषा करत महिलेनं पोलिसांशी हुज्जत घातली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिला आणि तिच्या पतीनं मास्क न घातल्यानं पोलिसांनी कार रोखली होती. दरियागंजमध्ये हा प्रकार घडला.
#WATCH | A couple misbehaved with Delhi Police personnel in Daryaganj area earlier today after they were stopped & asked the reason for not wearing face masks.
— ANI (@ANI) April 18, 2021
"An FIR under various sections of IPC has been lodged against them," say police.
(Video source - Delhi Police) pic.twitter.com/hv1rMln3CU
माझे वडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. हिंमत असेल तर पावती फाडून दाखवा. आले मास्कच्या नावाखाली भीक मागायला, अशा शब्दांत महिलेनं पोलिसांशी वाद घातला. त्यामुळे बराच वेळ रस्त्यात गोंधळ सुरू होता. पोलिसांनी महिलेला मास्क न घालण्याचं कारण विचारलं. त्यावर मी तर याला इथेच किस करेन. रोखू शकत असाल तर रोखून दाखवा, असं आव्हानच महिलेनं पोलिसांना दिलं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेकडे कर्फ्यू पासदेखील नव्हता. काही कोरोना वगैरे नाहीए. उगाच लोकांना त्रास दिला जात आहे, असं म्हणत महिलेनं पोलिसांसाठी अपशब्द वापरले. या प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला.