संसदेत घुसखोरी प्रकरण: मास्टरमाइंड ललित झा कोर्टात हजर; ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 05:06 PM2023-12-15T17:06:47+5:302023-12-15T17:07:25+5:30
Lok Sabha Parliament Security Breach: दिल्ली पोलिसांनी ललित झा याला कोर्टासमोर हजर केले.
Lok Sabha Parliament Security Breach: १३ डिसेंबर रोजी संसद हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण झाली, त्याच दिवशी लोकसभेत गोंधळ पाहायला मिळाला. कामकाज सुरू असताना अचानक प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी सभागृहात उडी मारली आणि बेंचवर उड्या मारून गोंधळ घातला. अन्य दोघांनी संसद परिसरात निदर्शने करत घोषणाबाजी केली. या प्रकरणातील मास्टरमाइंड ललित झा स्वतःहून पोलिसांना शरण आला होता. ललित झा याला दिल्लीतीलन्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने ललित झा याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संसदेतील सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार जणांवर दहशतवादविरोधी कायदा (यूएपीए) व्यतिरिक्त भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. आरोपी संसदेत पोहोचण्यापूर्वी गुरुग्राममध्ये विशाल शर्मा ऊर्फ विकी याच्या घरी थांबले होते. सागर शर्मा, मनोरंजन डी., अमोल शिंदे आणि नीलम देवी या चारही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेनंतर फरार झालेला ललित झा याने स्वतःहून दिल्लीतील कर्तव्य पथ पोलीस स्थानकात गुरुवारी आत्मसमर्पण केले.
विशेष पथकाने १५ दिवसांची रिमांड मागितली
ललित झा याला विशेष पथकाकडे सोपवण्यात आले होते. विशेष पथकाने ललित झा याला पातियाळा हाऊस न्यायालयात हजर केले. यावेळी ललित झा याची १५ दिवसांची रिमांड द्यावी, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली. मात्र, न्यायालयाने ललित झा याची ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली. गुरुवारी रात्री पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर ललित झा याची कसून चौकशी करण्यात आली.
दरम्यान, पातियाळा हाऊस न्यायालयाने ललितसाठी वकिलांची नियुक्ती केली. ललितचे वकील म्हणून उमाकांत कटारिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ललितसह अन्य आरोपींचे वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.