"गुढघे टेका नाहीतर..."; दिल्लीत क्लबबाहेर गोळीबार, महिलेच्या डोक्यावर ठेवली पिस्तुल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 16:45 IST2024-09-08T16:31:25+5:302024-09-08T16:45:53+5:30
दिल्लीत काही हल्लेखोरांनी एका क्लबबाहेर गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

"गुढघे टेका नाहीतर..."; दिल्लीत क्लबबाहेर गोळीबार, महिलेच्या डोक्यावर ठेवली पिस्तुल
Delhi Firing : राजधानी दिल्लीत गुंडांना पोलिसांचा धाक राहिला आहे की ना असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कारण दिल्लीत भररस्त्यात गोळीबाराची घटना समोर आली आहे. दिल्लीत एका नाईट क्लब बाहेर काही गुंडाकडून गोळीबार करण्यात आला. क्लब बाहेर असलेल्या सुरक्षा रक्षकांना धमकावून आरोपींनी हा गोळीबार केला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
दिल्लीतील सीमापुरी भागात नाईट क्लबबाहेर गोळीबाराची घटना घडली. काही हल्लेखोरांनी क्लब बाहेर हवेत गोळीबार केला आणि तेथील बाऊन्सर्सनाही गुडघ्यावर बसण्यास भाग पाडले. या बाऊन्सर्समध्ये एका महिलेचाही समावेश होता. ५ सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ वाजता घडल्याचे समोर आलं आहे. सशस्त्र हल्लेखोरांनी गोळीबार करत बाउन्सरला गुडघे टेकण्यास सांगितले. ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
कांच नाईट क्लबमध्ये हा सगळा प्रकार घडला. आरोपी रात्रीच्या सुमारास नाईट क्लब बाहेर आले होते. यातील चार हल्लेखोर नाईट क्लबमध्ये जातात तर एकजण बाहेर उभा राहून बाऊन्सर्सना धमकावत गुडघे टेकायला सांगतो. काही मिनिटांनी दोन हल्लेखोरांनी हवेत गोळीबार सुरू केला आणि नंतर तेथून पळ काढला. हे आरोपी क्लब मालकाला धमकावण्यासाठी आणि त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी आले होते. पळून जाण्यापूर्वी त्यांनी हवेत १२ हून अधिक गोळ्या झाडल्या. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, दहशत निर्माण करण्यासाठी हल्लेखोरांनी महिला बाऊन्सरच्या डोक्यावर बंदूक ठेवली होती. प्राथमिक तपासानुसार, क्लबच्या मालकाने हल्लेखोरांना पैसे देण्यास नकार दिला, म्हणून त्यांनी नाईट क्लबवर हल्ला केला. मात्र माध्यमांच्या वृत्तानुसार हल्लेखोरांना मोफत प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे त्यांनी नाईट क्लबवर हल्ला केला.
दरम्यान, यातील दोन हल्लेखोरांची ओळख पटली आहे. तनिश उर्फ पहेलवान आणि शाहरुख अशी दोन हल्लेखोरांची नावे आहेत. दिल्ली पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींना पकडण्यासाठी त्यांचा शोध सुरु केला आहे.