पुरावरून राजकारण तापलं! "दिल्ली जाणूनबुजून बुडवली, भाजपाच जबाबदार"; आपचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 01:07 PM2023-07-15T13:07:27+5:302023-07-15T14:21:53+5:30
दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी दिल्ली जाणूनबुजून बुडवली गेली आणि त्याला भाजपाच जबाबदार आहे असा गंभीर आरोप केला आहे.
दिल्लीत यमुनेच्या पाण्याची पातळी कमी होत असली तरी अनेक भाग अजूनही पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. याच दरम्यान, दिल्लीतील पुराबाबत आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले आहे. पुरावरून राजकारण तापलं आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी दिल्ली जाणूनबुजून बुडवली गेली आणि त्याला भाजपाच जबाबदार आहे असा गंभीर आरोप केला आहे.
सौरभ भारद्वाज म्हणाले की, 'दिल्ली जाणूनबुजून बुडवली गेली, हथिनीकुंडचे जास्तीचे पाणी फक्त दिल्लीला पाठवले गेले.' सौरभ भारद्वाज यांचा दावा आहे की, "हथिनीकुंडमधून फक्त दिल्लीसाठी पाणी सोडण्यात आले, तर पश्चिम कालव्यासाठी पाणी सोडले नाही. यावरून राजकारण केलं जात आहे. सर्वोच्च न्यायालयासह दिल्लीतील सर्व महत्त्वाच्या इमारती बुडवण्याचा कट होता."
आपचे खासदार संजय सिंह म्हणाले, "हिमाचल, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि यूपी या पुरामुळे पूर्णपणे प्रभावित झाले आहेत. दिल्लीत तीन दिवसांपासून पाऊस नाही, मग पुराचं कारण काय? याचे कारण भाजपा आणि केंद्राचा दिल्लीप्रती असलेला द्वेष, दिल्ली नष्ट करण्याचे षडयंत्र, मोदीजींचा दिल्लीबद्दलचा द्वेष. ही आपत्तीची स्थिती आहे, ती देशाच्या कोणत्याही भागात येऊ शकते. हा एक प्रायोजित पूर आहे, एक प्रायोजित आपत्ती आहे. मोदीजी देशाला सोडून फ्रान्सला गेले आहेत." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दिल्लीकरांची वाढली चिंता, 3 मोठे वॉटर प्लान्ट बंद
दिल्लीतील नागरिकांची चिंता आता आणखी वाढली आहे. पुरामुळे बाधित लोकांना आता पाणीटंचाईला देखील सामोरे जावे लागू शकते. तीन मोठे वॉटर प्लान्ट बंद पडले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती देताच दिल्लीकरांचं टेन्शन वाढलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं होतं. यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने वजीराबाद, चंद्रावल आणि ओखला येथील वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट बंद करावे लागले आहेत. त्यामुळे दिल्लीतील काही भागात पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. यमुनेचे पाणी कमी होताच आम्ही ते लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करू. जलसंकटामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल वजीराबाद जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.