Dengue: कोरोनानंतर आता डेंग्यूचा संसर्ग, 1537 जणांना लागण तर 6 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 03:07 PM2021-11-01T15:07:19+5:302021-11-01T15:07:57+5:30
केंद्रीय आरोग्य मंत्रालयांने बाधित राज्यांना मदत करण्यासाठी तज्ञांची टीम पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीतडेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडाही वाढल्याने चिंता आणखीनच वाढली आहे. गेल्या आठवड्यात डेंग्यूमुळे 5 मृत्यूची नोंद झाली आहे, त्यामुळे आता दिल्लीतील मृतांची संख्या एक वरून 6 झाली आहे. गेल्या आठवडाभरात डेंग्यूच्या नव्या रुग्णांची संख्याही 531 झाली. त्यानंतर आता एकूण रुग्णसंख्या 1537 वर गेली आहे. डेंग्यू आणि मलेरियासह चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्येही वाढ होताना दिसत आहे.
दिल्लीत सध्या मलेरियाचे 160 आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये 73 वरुन 81 पर्यंत वाढ झाली आहे. म्हणजेच चिकुनगुनियाचे आठ नवीन रुग्ण समोर आले आहेत. डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियाच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांमुळे आता परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. दिल्ली महानगरपालिकेने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत आतापर्यंत एकूण 1,537 डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या आठवडाभरात एकूण आकडेवारीत रुग्णांची भरती अतिशय वेगाने झाली. म्हणजेच गेल्या आठवड्यात तीन महापालिकांव्यतिरिक्त नवी दिल्ली नगर परिषद, दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या हद्दीत डेंग्यूचे 531 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर डेंग्यूमुळे 5 जणांचा मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे.
तज्ज्ञांचे पथक बाधित राज्यांमध्ये जाणार
राजधानी दिल्लीत डेंग्यूमुळे बिघडलेल्या परिस्थितीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयांने बाधित राज्यांना मदत करण्यासाठी तज्ञांची टीम पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. सोमवारी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राजधानीतील डेंग्यूच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आढावा घेतला. यादरम्यान केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयावर भर देण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निर्णय घेतला की, डेंग्यूने बाधित राज्यांची ओळख आणि केसलोड माहिती गोळा केली जाईल. यासोबतच या राज्यांमधील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तज्ज्ञांची टीम पाठवण्याची योजनाही केंद्र सरकारने आखली आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे एका योजनेवर काम करण्यास सांगितले आहे. आरोग्यमंत्री मांडविया यांनी चाचणीचा वेग वाढवण्यास सांगितले आहे.
डेंग्यू तापग्रस्तांना मिळणार कोविड रुग्णांचे बेड
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली सरकारने एक आदेश जारी केला आहे, ज्यामध्ये कोविड-19 रुग्णांसाठी राखीव खाटांपैकी एक तृतीयांश डेंग्यू रुग्णांना देण्यास सांगितले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, कोरोना विषाणूची घटती प्रकरणे आणि डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.