केजरीवालांना झटका! 'आप'च्या आमदाराला ईडीने केली अटक, प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 01:04 PM2024-09-02T13:04:05+5:302024-09-02T13:23:49+5:30
दिल्लीत आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे.
AAP Amanatullah Khan Arrested : राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला मोठा झटका बसला आहे. आम आदमी पार्टीचे ओखला विधानसभेचे आमदार अमानतुल्ला खान यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. अमानतुल्ला खान यांच्या घरावर ईडीने सकाळी छापा टाकला होता. सहा तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या पथकाने अमानतुल्ला खान यांना ईडीने अटक करुन सोबत नेले. कथित वक्फ बोर्ड घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीच्या छाप्यानंतर अमानतुल्ला खान यांच्या घराबाहेर मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर अखेर ईडीने पथकाने खान यांना अटक केली आहे.
ईडीचे पथक सोमवारी सकाळी आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरी छापा टाकण्यासाठी पोहोचले होते. अमानतुल्ला यांनी सुरुवातीला ईडीच्या पथकाला घरात येऊ दिले नाही. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. सकाळी जेव्हा ईडीच्या पथक अमानतुल्ला खान घरात प्रवेश देत नव्हते तेव्हा दिल्ली पोलिसांच्या पथकाला तिथे बोलवण्यात आलं. पोलिसांनी अमानतुल्ला खान यांना समजवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला घरात येऊ द्यायचे नसेल तर तुम्ही घराबाहेर येऊन तपासात सहकार्य करा, असे पोलिसांनी सांगितले. मात्र खान यांनी घरात आजारी सासू असल्याचे सांगत वाद सुरुच ठेवला.
माझ्या अटकेनंतर माझ्या सासूचा मृत्यू झाला तर तुम्ही जबाबदारी घ्याल का? असं खान म्हणाले. त्यानंतर ईडीचा एक अधिकारी तुम्ही मोठ्या आवाजात बोलून तुमच्या सासूला त्रास देत आहात असं म्हणाला. त्यानंतर बऱ्याच वादावादीनंतर अधिकाऱ्यांनी घरात प्रवेश केला. अनेक तास झडती घेण्यात आली, सर्व कागदपत्रांची छाननी करण्यात आली. त्यानंतर खान यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. ईडीने अटक केल्यानंतर आमदार अमानतुल्ला खान यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप जितका जास्त आम्हाला दडपण्याचा प्रयत्न करेल, तितके आम्ही आवाज उठवू, असं अमानतुल्ला खान यांनी म्हटलं आहे.
प्रकरण काय?
दरम्यान, २०१६ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमानतुल्ला खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कथित मनी लाँड्रिंग उघडकीस आल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल केला. अमानतुल्ला खान हे एकेकाळी दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष होते. अध्यक्ष असताना त्यांनी बोर्डावर ३२ जणांची नियुक्ती केली ज्यासाठी कोणतेही नियम पाळले गेले नाहीत आणि सर्व मार्गदर्शक तत्त्वे बाजूला ठेवली गेली. या ३२ जणांच्या नियुक्तीद्वारे त्यांनी बोर्डाच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. वक्फ बोर्डाचे अध्यक्ष असताना त्यांनी तेथील अनेक मालमत्ता बेकायदेशीरपणे भाड्याने दिल्या होत्या, असाही आरोप करण्यात आला होता.
बेकायदेशीररीत्या भरती झालेल्या ३२ लोकांपैकी ५ जण खान यांचे नातेवाईक आहेत. तर इतर २२ लोक हे खान यांच्या ओखला मतदारसंघातील आहे. याप्रकरणी सीबीआय आणि ईडी दोघांनीही गुन्हा दाखल केला आहे. ईडीने ५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. तर सीबीआयने २०२२ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते.