Delhi Election :अरविंद केजरीवालांविरुद्ध भाजपकडून सुनील यादव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 05:31 AM2020-01-22T05:31:27+5:302020-01-22T05:32:52+5:30
भाजपाने नवी दिल्ली मतदारसंघातून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध प्रदेश भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सुनील यादव यांना रिंगणात उतरविले आहे
नवी दिल्ली : काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची तिसरी यादी जारी केली असून राज्यसभेचे माजी सदस्य परवेज हाश्मी यांना ओख्ला मतदारसंघातून काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. भाजपनेही मंगळवारी दहा उमेदवारांची दुसरी यादी घोषित केली असून, नवी दिल्ली मतदारसंघातून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध प्रदेश भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सुनील यादव यांना रिंगणात उतरविले आहे.
काँग्रेसचे माजी आमदार मुकेश शर्मा यांना विकासपुरीतून उमेदवारी देण्यात आली आहे. मेहरौली विधानसभा मतदारसंघातून मोहिंदर चौधरी यांना, तर बिजवासन विधानसभा दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी काँग्रेसने एकूण ६६ उमेदवार घोषित केले असून चार जागा आरजेडीसाठी सोडल्या आहेत.
काँग्रेसने शनिवारी ५४ उमेदवारांची पहिली यादी जारी केली होती. काँग्रेसने एकूण दहा महिलांना उमेदवारी दिली आहे. सोमवारी रात्री काँग्रेसने सात उमेदवारांची दुसरी यादी जारी केली होती. काँग्रेसने नवी दिल्ली विधानसभा मतदारसघांतून रोमेश सब्बरवाल यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध उमेदवारी दिली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ११ फेब्रुवारी रोजी निकाल घोषित होणार आहेत.
आम आदमी पार्टीने माजी मंत्री जितेंद्र सिंह तोमर यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी प्रीती तोमर यांना त्रिनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या मतदारसंघातून आधी जितेंद्र सिंह तोमर यांची उमेदवारी घोषित करण्यात आली होती. माझ्याऐवजी माझी पत्नी प्रीती तोमर निवडणूक लढवतील, असे मी पक्षाला सांगितले होते. पक्षाने मान्य करून हा निर्णय घेतला. २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत नामांकनपत्रासोबत शैक्षणिक पात्रतेसंबंधी खोटी माहिती दिल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची निवड रद्द केली होती. त्यानंतर आम आदमी पार्टीने उमेदवारीत बदल करण्याची घोषणा केली.
दिल्लीत अकाली दल भाजपपासून दूर
दिल्ली विधानसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाने भाजपसोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपशी नाते तोडल्यानंतर दिल्लीतही अनेक वर्षांपासून सहयोगी पक्ष राहिलेल्या अकाली दलाने भाजपला धक्का दिला आहे.
भाजपचे ६७ मतदारसंघांत उमेदवार
भाजपनेही मंगळवारी दहा उमेदवारांची दुसरी यादी घोषित केली असून, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध प्रदेश भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सुनील यादव यांना रिंगणात उतरविले आहे.
शिरोमणी अकाली दलाने सोमवारी रात्री भाजपसोबत निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने उमेदवारांची दुसरी यादी घोषित केली. भाजप ६७ जागा लढवीत आहे. भाजपने लोक जनशक्ती पक्षाला दोन जागा सोडल्या आहेत, तर जेडीयूसाठी एक जागा सोडली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भाजप व अकाली दलाने दिल्लीत एकत्रित निवडणुका लढल्या आहेत. दिल्लीत मोठ्या प्रमाणावर शिख समुदाय राहत असल्याने तसेच १९८४ च्या दंगलीनंतर हा समुदाय काँग्रेसपासून दूर गेला होता. याचा फायदा भाजप व अकाली दलाला झाला होता. अकाली दलाने भाजपकडे ८ जागांची मागणी केली होती. परंतु भाजपने चारपेक्षा अधिक जागा देण्यास नकार दिल्याने बोलणी फिस्कटल्याचे सांगितले जात आहे.