Delhi Election 2020: ‘ट्विटरवर’ युद्ध राजकीय पक्षांच्या अंगलट?, मुख्य निवडणूक आयोगांनी दिले कारवाईचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 05:35 AM2020-01-27T05:35:58+5:302020-01-27T05:40:01+5:30
२० जानेवारीची ही पोस्ट काढून टाकण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिल्लीतील सर्वच राजकीय पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर सुरू असलेले युद्ध त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे. विशेषत: भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्याकडे मुख्य निवडणूक आयोगाचा रोख असून या दोन्ही पक्षांवर कारवाईचे संकेतही देण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराचे छायाचित्र आणि त्याच्या बाजुला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच आमदार अमनतुल्ला खान यांची छायाचित्रे असल्याची एक पोस्ट भाजपने ट्विटरवर पोस्ट केली होती. हीच पोस्ट भाजपच्या सर्व सोशल मिडीया अकाऊंटवरून व्हायरल झाली.
‘आर्ट अँड आर्टिस्ट’ असे शिर्षक याला देण्यात आले होते. २० जानेवारीची ही पोस्ट काढून टाकण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. निवडणूक आचारहंसितेचा भंग करणारी ही पोस्ट असल्यास त्यावर तातडीने कारवाई करावी.
कुठल्याही परिस्थितीत धार्मिक व जातीय द्वेष पसरविणाºया पोस्ट खपवून घेऊ नका, अश्या स्पष्ट सूचनाही देण्यात आल्या आहेत. पण, हे केवळ एक प्रकरण नाही. तिन्ही पक्षांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर पडत असलेल्या सर्वच पोस्टवर आयोगाची करडी नजर आहे. एकमेकांची थट्टा करण्याच्या नादात राजकीय वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न होऊ नये, याची खबरदारी घेण्यासही मुख्य निवडणूक आयोगाने संबंधित पक्षांना कळविले आहे.
विशेषत: भाजपने पोस्ट केलेला ‘आप का खलनायक’ हा व्हिडीयो आणि ‘आप’ने पोस्ट केलेला मनोज तिवारी यांच्या गाण्याचा ‘लगे रहो केजरीवाल’ हा व्हिडीयो तातडीने काढून टाकण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने उभय पक्षांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीच्या निमित्ताने सोशल मिडीयावरील हे युद्ध सर्वसामान्यांचे मनोरंजन करणारे असले तरीही यातून आचारहंसितेचा भंग होत आहे, हे खरे आहे. बरेचदा परवानगी न घेता एखाद्या जाहिरातीचा किंवा सिमेनाच्या गाण्याचा व्हिडीयो डब केला जातो. यावरदेखील कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.