Delhi Election: केजरीवालांविरोधात भाजपाने उभा केला उमेदवार; दुसरी यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 09:13 AM2020-01-21T09:13:57+5:302020-01-21T09:15:25+5:30
भाजपाने 17 जानेवारीला 57 उमेदवारांची पाहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात उमेदवार देण्यात आला नव्हता.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली असून आपने एकाचवेळी 70 उमेदवार जाहीर केले होते. मात्र, भाजपाला मित्रपक्षांमुळे सर्व यादी जाहीर करता आली नव्हती. शिरोमणी अकाली दलाने सीएएवरून आवाज उठविता येत नसल्याने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेत भाजपाची साथ सोडली आहे. तर भाजपाला नितिशकुमार यांचा संजद आणि लोक जनशक्ती पक्षाचा पाठिंबा मिळाला असून हे दोन पक्ष तीन जागा लढविणार आहेत.
भाजपाने 17 जानेवारीला 57 उमेदवारांची पाहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात उमेदवार देण्यात आला नव्हता. सोमवारी रात्री उशिराने भाजपाने उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर केली असून यामध्ये केजरीवालांविरोधात सुनील यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपाने उर्वरित 10 जागांवर तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना हरीनगर, नांगलोई जाटहून सुमनलता शौकीन, राजौरी गार्डनहून रमेश खन्ना, नवी दिल्लीहून सुनील यादव, शाहदराहून संजय गोयल, कृष्णानगरहून अनिल गोयल, महरौलीहून कुसुम खत्री, कालकाजीहून धर्मवीर सिंह आणि कस्तूरबानगरहून रविंद्र चौधरी यांना तिकीट देण्यात आले आहे.
भाजपाच्या 57 उमेदवारांची यादी जाहीर; आपच्या मंत्र्याला तिकीट
तर दिल्लीमध्ये युतीमुळे दोन जागा जदयूला देण्यात आल्या आहेत. यामध्ये संगम बिहार आणि बुराडी या जागा आहेत. तर एक जागा लोजपाला देण्यात आली आहे.
भाजपाला मोठा धक्का; शिवसेनेनंतर आणखी एका पक्षाने 21 वर्षांची साथ सोडली
भाजपाचा सर्व्हे काय सांगतो?
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता दिल्लीतील जनतेचा संभाव्य कल सांगणारे ओपिनियन पोल प्रसिद्ध झाले. एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने आज प्रसिद्ध केलेल्या ओपिनियन पोलमधून दिल्लीमध्ये आपचीची सत्ता कायम राहणार असल्याचा कल दर्शवला आहे. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष पुन्हा एकदा मोठ्या बहुमतासह विजयी होणार असून, भाजपा आणि काँग्रेसला दोन आकडी जागाही जिंकता येणार नाहीत, असा अंदाज या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे. तर भाजपाने केलेल्या सर्व्हेमध्ये केजरीवाल जरी पंसती असले तरीही मतदार आमदारांवर नाराज असल्याचे पुढे आले होते.