दिल्ली निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, अरविंद केजरीवालांना आव्हान देणार प्रवेश वर्मा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:46 IST2025-01-04T13:36:43+5:302025-01-04T13:46:24+5:30

BJP First Candidate List : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने प्रवेश साहिब सिंह वर्मा यांना तिकीट दिले आहे.

delhi election bjp first list candidate parvesh verma arvind kejriwal athishi | दिल्ली निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, अरविंद केजरीवालांना आव्हान देणार प्रवेश वर्मा!

दिल्ली निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, अरविंद केजरीवालांना आव्हान देणार प्रवेश वर्मा!

BJP First Candidate List : नवी दिल्ली : दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत भाजपने २९ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने प्रवेश साहिब सिंह वर्मा यांना तिकीट दिले आहे. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात रमेश बिधुरी यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे आपमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या कैलाश गेहलोत यांना बिजवासन मतदारसंघातून पक्षाने तिकीट दिले आहे.

भाजपने आदर्श नगर मतदारसंघातून राजकुमार भाटिया, बदलीमधून दीपक चौधरी, रिठालामधून कुलवंत राणा, नांगलोई जाटमधून मनोज शौकीन, मंगोलपुरीमधून राजकुमार चौहान, रोहिणीमधून विजेंद्र गुप्ता, शालीमार बागमधून रेखा गुप्ता, मॉडल टाउनमधून अशोक गोयल, करोल बागमधून दुष्यंत कुमार गौतम, पटेल नगरमधून राजकुमार आनंद, राजौरी गार्डन येथून सरदार मनजिंदर सिंग सिरसा, जनकपुरीमधून आशिष सूद यांना तिकिट दिले आहे.

याचबरोबर, नवी दिल्लीतून प्रवेश साहिब सिंग वर्मा, जंगपुरामधून सरदार तरविंदर सिंग, मालवीय नगरमधून सतीश उपाध्याय, आरके पुरममधून अनिल शर्मा, मेहरौलीमधून गजेंद्र यादव, छतरपूरमधून कर्तारसिंग तंवर, आंबेडकर नगरमधून खुशीराम चुनार, कालकाजीमधून रमेश बिधुरी, बदरपूरमधून नारायण दत्त शर्मा, पटपरगंजमधून रवींद्र सिंग नेगी, विश्वास नगरमधून ओम प्रकाश वर्मा, कृष्णा नगरमधून अनिल गोयल, गांधीनगरमधून अरविंदर सिंग लवली, सीमापुरीतून कुमारी रिंकू, रोहतास नगरमधून जितेंद्र महाजन आणि घोंडामधून अजय महावर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना संधी
दुसऱ्या पक्षांतून बंडखोरी करून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांनाही पक्ष हायकमांडने विधानसभा निवडणुकीत संधी दिली आहे. यामध्ये करतार सिंग तंवर, राजकुमार चौहान, कैलाश गेहलोत आणि अरविंदर सिंग लवली यांचा समावेश आहे.

पहिल्या यादीत दोन महिलांना तिकीट
भाजपने २९ जागांसाठी ज्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, त्यापैकी दोन महिला आहेत. रेखा गुप्ता यांना शालीमार बागमधून उमेदवारी देण्यात आली असून सीमापुरी अनुसूचित जाती मतदारसंघातून कुमारी रिंकू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Web Title: delhi election bjp first list candidate parvesh verma arvind kejriwal athishi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.