दिल्लीत ४५ जागा जिंकून भाजपा सरकार बनवणार; अमित शहांच्या दाव्यामागे 'हे' आहे लॉजिक!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 12:53 PM2020-02-07T12:53:19+5:302020-02-07T12:55:08+5:30
गृहमंत्री अमित शहा आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मेळाव्यांनी दिल्लीत निवडणुकीचे वातावरण बदलण्याचे काम केले
नवी दिल्ली - निवडणुकीच्या आखाड्यातील चाणक्य म्हणून प्रतिमा निर्माण करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपा ७० पैकी ४५ जागा जिंकून सरकार स्थापन करेल असा दावा केला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत भाजपाच्या बाजूने वारे वाहतंय असं सांगितलं. मात्र तरीही भाजपा नेत्यांचे चेहरे उतरलेले दिसत आहेत. त्यामुळे मोदी-शहा यांनी केलेल्या दाव्यामुळे जनता अरविंद केजरीवाल यांना पुन्हा संधी देणार नाही असं भाजपातील नेत्यांना वाटत आहे.
रॅलीमधून राजकीय हवा बदलण्याची अपेक्षा
स्वत: मोदी-शहा तसेच पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या रॅलीमध्ये जमलेली गर्दी, पक्षाचा अंतर्गत कथित सर्व्हे यातून जनतेचा बदलेला मुड आणि काही ओपनियन पोलचे निकाल त्यामुळे भाजपाला आशेचे किरण दिसत आहेत. भाजपा नेत्यांचा असा विश्वास आहे की गृहमंत्री अमित शहा आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मेळाव्यांनी दिल्लीत निवडणुकीचे वातावरण बदलण्याचे काम केले त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांनंतर वातावरण भाजपाच्या बाजूने दिसायला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पूर्व दिल्लीत घेतलेल्या सभेनंतर दिल्लीतील सर्व विधानसभा मतदार संघात पक्षाचे अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले. मोदींनी शाहीन बाग, सर्जिकल स्ट्राइक, बाटला हाऊस या विषयांवर आपली मतं उघडपणे व्यक्त केली, त्याचा लोकांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे असा दावा या सर्वेक्षणातील आकड्यांच्या आधारे केला जात आहे.
अंतर्गत सर्वेक्षणामुळे भाजपाचा उत्साह वाढला
भाजपाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोदींच्या मेळाव्यापूर्वी झालेल्या सर्व सर्वेक्षणांमध्ये, दिल्लीत आम आदमी पक्ष भाजपाला जोरदार टक्कर देताना दिसत होता. परंतु निकाल आम आदमी पक्षाच्या बाजूने झुकताना दिसले. मात्र, योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांनंतर भाजपा आणि आपमध्ये कडवी झुंज होताना दिसत आहे. यात निकाल आता भाजपाच्या बाजूने झुकताना दिसतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सर्वेक्षणात कॉंग्रेस बर्याच जागांवर विजयी होताना दिसत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशीरा केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपा २७ जागा मिळताना दिसत होत्या, तर आपला २६, काँग्रेसला ८ ते ९ जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला. पक्षाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार या सर्व्हेनुसार आप आणि भाजपात कडवी लढत आहे. निकाल कोणाच्याही बाजूने जाऊ शकतो, मात्र मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली पश्चिम, द्वारका याठिकाणी घेतलेल्या जाहीर सभांमुळे वातावरण भाजपासाठी पोषक ठरण्याची शक्यता आहे. विशेषत: पश्चिमी दिल्लीच्या ग्रामीण भागात भाजपाची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
मेळाव्यात जमलेल्या गर्दीमुळे अपेक्षा वाढल्या.
शहा यांनी सभेच्यावेळी जमलेल्या गर्दीचे अनेक फोटो ट्विट केले. मडीपूर आणि सीमापुरी विधानसभा मतदारसंघातील रोड शोचे फोटो शेअर करताना ते म्हणाले की, रोड शोला जमलेल्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या संख्येने दिल्लीत भाजपा किती लोकप्रिय आहे याचा अंदाज येतो.
चुनाव के दौरान दिल्ली की जनता से संवाद करने का मौका मिला। झूठे वादे, तुष्टिकरण और अराजकता से त्रस्त दिल्ली को अब बस विकास चाहिए।
— Amit Shah (@AmitShah) February 6, 2020
दिल्ली में भाजपा के लिए जो समर्थन देखा है उससे ये साफ है कि 11फरवरी को भाजपा दिल्ली में 45 से अधिक सीट जीत कर सरकार बनाने जा रही है। #BJP45PlusInDelhi
जेव्हा मी दिल्लीतील लोकांशी संपर्क साधला, तेव्हा असे स्पष्ट झाले की ते खोटी आश्वासने, विभाजनाचे राजकारण आणि अराजकतेमुळे लोक त्रस्त आहेत. त्यांना आता विकास हवा आहे. दिल्लीत भाजपला मिळत असलेला पाठिंबा पाहता हे स्पष्ट झाले आहे की 11 फेब्रुवारी रोजी भाजपा 45 हून अधिक जागा जिंकून दिल्लीत सरकार स्थापन करणार आहे असंही अमित शहा म्हणाले.