दिल्लीत योगींची 'जादू' चालली, बुलडोझरसमोर केजरी'वॉल' 'ध्वस्त'! स्ट्राइक रेट बघून विरोधकही थक्क होतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:15 IST2025-02-08T17:14:16+5:302025-02-08T17:15:27+5:30
Delhi Election Result 2025 : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतही जोरदार प्रचार केला. त्यांनी येथे सुमारे १४ विधानसभा जागांसाठी सभा घेतल्या होत्या...

दिल्लीत योगींची 'जादू' चालली, बुलडोझरसमोर केजरी'वॉल' 'ध्वस्त'! स्ट्राइक रेट बघून विरोधकही थक्क होतील
Delhi Election Result 2025: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत, फायरब्रँड नेते आहेत. ते केवळ उत्तर प्रदेशच नव्हे, तर देशातील इतर राज्यांतही तेवढेच लोकप्रिय आहेत. याची प्रचिती अनेक निवडणुकांमधून आली आहे. मग ती महाराष्ट्र विधानसभा निवडणूक असो किंवा हरियाणा विधानसभा निवडणूक. मुख्यमंत्री योगींनी प्रचार केलेल्या बहुतेक जागा भाजपने जिंकल्या आहेत. आता यात आणखी एक नाव जोडले गेले आहे. ते म्हणजे दिल्ली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतही जोरदार प्रचार केला. त्यांनी येथे सुमारे १४ विधानसभा जागांसाठी सभा घेतल्या. यांपैकी भाजपने ११ जागा जिंकल्या आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांत भारतीय जनता पक्ष दिल्लीत सरकार स्थापन करताना दिसत आहे.
योगींनी या मतदारसंघांमध्ये केला होता प्रचार -
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, मंगोलपुरी, जेजे कॉलनीतील शिव विहार, इंद्रपुरीतील बुद्ध नगर, किराडी, करोल बाग, जनकपुरी विधानसभा, घोंडा, शाहदरा, उत्तम नगर, द्वारका, बिजवासन, पालम, राजेंद्र नगर, पटपडगंज, सुलतानपूर आणि देवनगर येथे सभा घेतल्या. या रॅलींमध्ये मुख्यमंत्री योगी यांनी आम आदमी पक्षावर जोरदार निशाणा साधला होता.
या जागांवर मिळाला विजय -
मंगोलपुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राजकुमार चौहान विजयी झाले. मुख्यमंत्री योगींनी प्रचार केल्या शिव विहार मधील संगम विहार विधानसभा मतदारसंघातून भाजपचे चंदन कुमार चौधरी विजयी झाले. जनकपुरी विधानसभा जागेवर भाजपचे उमेदवार आशिष सूद यांनी विजय मिळवला. घोंडा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अजय महावार विजयी झाले. शाहदरा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय गोयल विजयी झाले.
याशिवाय, उत्तम नगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार पवन शर्मा विजयी झाले. द्वारका विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रद्युम्न राजपूत, बिजवासनमधून आपमधून भाजपमध्ये सामील झालेले कैलाश गेहलोत, पालम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कुलदीप सोलंकी, राजेंद्र नगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार उमंग बजाज, तसेच पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार रवींद्र सिंह नेगी विजयी झाले आहेत.
या जागांवर भाजपचा पराभव -
मुख्यमंत्री योगींनी ज्या १४ जागांवर प्रचार केला, त्यांपैकी भाजपचा फक्त तीन जागांवरच पराभव झाला. यात सुलतानपूर, किराडी आणि करोल बाग विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.