Delhi Election Results: केजरीवालांना दहशतवादी म्हणणं महागात पडलं; जाणून घ्या 'त्या' तिघांच्या मतदारसंघात काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 05:58 PM2020-02-11T17:58:57+5:302020-02-11T18:03:17+5:30
Delhi Assembly Election Results Updates: विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपाच्या नेत्यांकडून केजरीवालांवर पातळी सोडून टीका
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं दणदणीत विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि तब्बल २०० खासदार दिल्लीत तळ ठोकून असल्यानं दिल्ली विधानसभा निवडणूक चुरशीची होईल, असा अंदाज होता. मात्र आपच्या झंझावातासमोर ही निवडणूक कमालीची एकतर्फी झाली. सध्या भाजपाचे ३४ उमेदवार विजयी झाले असून २९ उमेदवार आघाडीवर आहेत. आपनं २०१५ च्या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. त्यामुळे भाजपाला पुन्हा एकदा दुहेरी आकडा गाठण्यातही अपयश येताना दिसत आहे.
भाजपाच्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान अरविंद केजरीवालांवर जहरी टीका केली. मात्र दिल्लीकरांनी नकारात्मक राजकारण नाकारलं. शाहीन बागेत सुरू असलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातल्या आंदोलनावरुन भाजपा नेत्यांनी केजरीवालांवर जोरदार टीका केली. या सर्वच नेत्यांना जनतेनं नाकारलं.
केजरीवालांना दहशतवादी म्हणणाऱ्या कपिल मिश्रांचा दारुण पराभव
२०१५ ची विधानसभा निवडणुकीत कपिल मिश्रांनी आपच्या तिकीटावर लढवली. त्यांच्याकडे जल मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. मात्र केजरीवालांवर टीका करत त्यांनी पक्ष सोडला. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होताच त्यांनी केजरीवालांना दहशतवादी म्हटलं. केजरीवालांवर पातळी सोडून टीका करणाऱ्या मिश्रा यांना जनतेनं स्पष्टपणे नाकारलं. आपच्या अखिलेश पति त्रिपाठी यांनी त्यांचा जवळपास ११ हजार मतांनी पराभव केला.
शाहीन बागेवरुन राजकारण करणं परवेश वर्मांना महागात
लोकसभेत पश्चिम दिल्लीचं प्रतिनिधीत्व करणारे भाजपा खासदार परवेश वर्मा यांनी प्रचारादरम्यान आप आणि केजरीवालांवर तोंडसुख घेतलं. शाहीन बाग, बिर्यानी, बांगलादेश, पाकिस्तान, दहशतवादी अशा शब्दांचा वर्मा यांनी प्रचारादरम्यान वापर केला. वर्मा यांच्या लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या दहा जागा येतात. त्या सर्वच्या सर्व १० जागांवर भाजपाला पराभव पत्करावा लागला.
तेजिंदर सिंह बग्गांना जनतेनं नाकारलं
हरी नगर विधानसभा मतदारसंघातून भाजपानं तेजिंदर सिंग बग्गा यांना उमेदवारी दिली होती. फायर ब्रँड नेते म्हणून स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नात बग्गा यांनी अनेकदा केजरीवालांना लक्ष्य केलं. गेल्या पाच वर्षांपासून ते ट्विटरवरही आक्रमक होते. निवडणूक प्रचारादरम्यान ते जाहीरपणे केजरीवालांना दहशतवादी म्हणत होते. आपच्या उमेदवार राज कुमारी ढिल्लॉ यांनी त्यांचा १७ हजारहून अधिक मतांनी पराभव केला.