प्रवेश वर्मांच्या मार्गात अडथळा! निकालानंतर 'या' भाजप आमदाराने केला मुख्यमंत्रीपदाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:23 IST2025-02-08T16:22:40+5:302025-02-08T16:23:55+5:30
Delhi Election Result : आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश साहिब सिंह वर्मा यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे.

प्रवेश वर्मांच्या मार्गात अडथळा! निकालानंतर 'या' भाजप आमदाराने केला मुख्यमंत्रीपदाचा दावा
Delhi Election Result : नवी दिल्ली : तब्बल २७ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भाजपानेदिल्लीतआपला विजय नोंदवला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवले आहे. भाजपच्या दणदणीत विजयानंतर आता दिल्लीत मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री पदासाठी भाजपमध्ये अनेक मोठे चेहरे आहेत. आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश साहिब सिंह वर्मा यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे.
अशातच पाच वेळा आमदार राहिलेले मोहन सिंह बिष्ट यांनी अप्रत्यक्षपणे स्वत: मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला आहे. एबीपी न्यूजशी खास संवाद साधताना मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर मोहन सिंग बिष्ट म्हणाले, "मी सहा वेळा जिंकलो आहे, माझी प्रोफाईल मुख्यमंत्री होण्याइतकी आहे. मात्र, मुख्यमंत्रीपद हे वरच्या स्तरावर ठरवले जाईल, परंतू किमान मी प्रोटेम स्पीकर तरी होईन. मीच आमदारांना शपथ देईन."
दरम्यान, भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत प्रवेश साहिब सिंह वर्मा, मनोज तिवारी आणि वीरेंद्र सचदेवा यांसारखे चेहरांचा समावेश आहे. प्रवेश साहिब सिंह वर्मा यांचा दावा अधिक मजबूत मानला जात आहे. त्यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी २०१३, २०१५ आणि २०२० मध्ये नवी दिल्ली मतदारसंघातून विजय मिळवला होता.
मोहन सिंह बिष्ट कोण आहेत?
मोहन सिंह बिष्ट हे करावल नगरमधून पाच वेळा आमदार राहिले आहेत. यंदाच्या निवडणुकीत पक्षाने मोहन सिंग बिष्ट यांना करावल नगरऐवजी मुस्तफाबादमधून उमेदवारी दिली. यावर मोहन सिंग बिष्ट यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, नंतर त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. भाजपने करावल नगरमधून कपिल मिश्रा यांना तिकीट दिले. मोहन सिंग बिष्ट यांना २०१५ मध्येच पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा कपिल मिश्रा यांनी आपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि मोहन सिंग बिष्ट यांचा पराभव केला होता. नंतर कपिल मिश्रा हे भाजपमध्ये सामील झाले.
प्रवेश वर्मा यांनी घेतली अमित शाह यांची भेट!
प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी शनिवारी निवडणूक जिंकल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्रीपदासंदर्भात चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. तत्पूर्वी, निवडणूक प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी वर्मा यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला होता. तसेच, भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा प्रवेश साहिब सिंह वर्मा असणार का? असा सवालही विचारला होता.