Delhi Election Result:केजरीवाल पुन्हा साधणार टायमिंग; दणक्यात साजरा होणार व्हॅलेंटाईन डे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 10:40 PM2020-02-11T22:40:39+5:302020-02-11T22:41:04+5:30
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळाल्यानंतर आता आपचे पाठीराखे आणि दिल्लीकरांना केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचे वेध लागले आहेत.
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपने भाजपाला भुईसपाट करत दणदणीत विजय मिळवला आहे. आता आपचे पाठीराखे आणि दिल्लीकरांना केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचे वेध लागले आहेत. दरम्यान, अरविंद केजरीवाल हे पुन्हा एकदा १४ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यासाठी १४ फेब्रुवारी ही व्हॅलेंटाइन डे ची तारीख यांचे खास नाते आहे. केजरीवाल यांनी २८ डिसेंबर २०१३ रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर बरोब्बर ४९ दिवसांनी म्हणजेच १४ फेब्रुवारी २०१४ रोजी केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
त्यानंतर दिल्लीत वर्षभर चाललेल्या राजकीय अस्थिरतेनंतर २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा आपने तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला केवळ तीन जागा जिंकण्यात यश मिळालं होतं. त्यानंतर केरजीवाल यांनी १४ फेब्रुवारी रोजी केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा केजरीवाल हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.