दिल्लीत केजरीवाल यांच्या बंपर विजयात ही पंचसूत्री ठरली निर्णायक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 09:28 PM2020-02-11T21:28:58+5:302020-02-11T21:29:16+5:30
दिल्ली विधानसभेतील ७० जागांपैकी ६२ जागांवर आपचे उमेदवार विजयी झाले. तर भाजपाला केवळ ८ जागांवर विजय मिळाला आहे.
नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. दिल्ली विधानसभेतील ७० जागांपैकी ६२ जागांवर आपचे उमेदवार विजयी झाले. तर भाजपाला केवळ ८ जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान, आपच्या आजच्या विजयात पाच घटकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
दिल्लीच्या विकासावर लक्ष केंद्रित करून प्रचार
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासूनच अरविंद केजरीवाल यांनी सकारात्मक प्रचारावर भर दिला. त्यांनी पाच वर्षांत केलेला दिल्लीचा विकास हाच मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवला. त्याचा फायदा आपला झाला.
मोफत वीज आणि पाणी
अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिल्लीकरांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज आणि २० हजार लीटरपर्यंत मोफत पाणी पुरवण्याची घोषणा केली होती. त्याचा लाभ गरीब वर्गाला मोठ्या प्रमाणावर झाला. आता निवडणुकीत आपने या कामाच्या बदल्यात मते मागितली आणि आपच्या झोळीत मतांचे भरभरून दान पडले.
आरोग्य आणि शिक्षण
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत दिल्लीतील आरोग्य सुविधा आणि शिक्षणावर भर दिला. त्यांनी अर्थसंकल्पामधून शिक्षण आणि आरोग्यासाठी भरीव तरतूद केली. त्याचे परिणाम म्हणून दिल्लीतील आरोग्य आणि शिक्षणव्यस्था सुधरली आहे. त्याचाही आपला लाभ झाला.
महिलांना मेट्रो आणि बसमधून मोफत प्रवास
दिल्लीतील महिलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने मेट्रो आणि सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्थेमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याची घोषणा केजरीवाल यांनी केली. याचा दिल्लीतील महिलांना मोठ्या प्रमाणावर लाभ झाला. त्याचेही प्रतिबिंब आजच्या निकालात उमटले.
ऑड इव्हन आणि प्रदूषण नियंत्रण
दिल्लीतील प्रदूषणाची समस्या गंभीर असली तरी येथील प्रदूषण नियंत्रित करण्याच्या दृष्टीने केजरीवाल यांनी प्रामाणिक प्रयत्न केले होते. त्यासाठी त्यांनी दिल्लीत वाहनांसाठी ऑड इव्हनचा फॉर्म्युलाही आणला.