मध्य प्रदेश, राजस्थानसारखेच मोदी दिल्लीतही सरप्राईज देणार? आपला 'खास' मुख्यमंत्री करणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 13:14 IST2025-02-08T13:13:21+5:302025-02-08T13:14:16+5:30
Delhi Election Result News: दिल्लीत भाजपा तब्बल २७ वर्षांनी सत्तेत येत आहे. थोड्याच वेळात मोदी दिल्लीवासियांना संबोधित करणार आहेत.

मध्य प्रदेश, राजस्थानसारखेच मोदी दिल्लीतही सरप्राईज देणार? आपला 'खास' मुख्यमंत्री करणार...
दिल्लीत भाजपा तब्बल २७ वर्षांनी सत्तेत येत आहे. आधी १५ वर्षांचे काँग्रेसची सत्ता आपने मोडीत काढली होती. त्या आपने तीन निवडणुका लढल्या, ११ वर्षे सत्ता उपभोगली. आता आपकडून सत्ता हिसकावून घेत भाजपाने दिल्लीत मोठी मुसंडी मारली आहे. थोड्याच वेळात मोदी दिल्लीवासियांना संबोधित करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता फार कमी असली तरी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानप्रमाणे मोदी दिल्लीत मोठे सरप्राईज देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सत्ता कोणाच्याही अधिपत्त्याखाली आली तरी भाजपाने गेल्या काही काळापासून त्या व्यक्तीला बाजुला करून नवा चेहरा दिलेला आहे. दिल्लीत काही नेत्यांची नावे चर्चेत आहेत. परंतू, भाजपा खासदार मनोज तिवारी यांचे नाव सर्वात पुढे असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दिल्ली निवडणुकीत भाजपाने प्रचंड सोशल इंजिनिअरिंग केलेले आहे. दिल्ली निवडणुकीत पुर्वांचलच्या लोकांची मते महत्वाचा मुद्दा बनली होती. भाजपा आणि आप या दोघांनीही एकमेकांवर या मतदारांचा अपमान केल्याचा आरोप केला होता. केजरीवालांनी पुर्वांचली व्होट बँकेला आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक आश्वासने दिली होती. मनोज तिवारी हे स्वत:पुर्वांचलचे आहेत. त्यांना जर मुख्यमंत्री पद दिले तर भाजपाचा तो मास्टरस्ट्रोक ठरणार आहे. भविष्यात बिहार निवडणूक येत आहे. दिल्लीतून बिहारमध्ये परिणाम करणारा निर्णय ठरू शकतो.
एका पुर्वांचली व्यक्तीला दिल्लीचा मुख्यमंत्री केले तर त्याचा फायदा बिहारमध्ये होण्याचा अंदाज भाजपला आहे. सध्या बिहारच्या जिवावर केंद्रात भाजपा सत्तेत आहे, जास्त जागा असूनही भाजपा बिहारमध्ये छोट्या भावाच्या भुमिकेत आहे. महाराष्ट्रासारखीच मोठ्या भावाच्या भुमिकेत जाण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. यासाठी पूर्वांचली चेहरा मदत करू शकतो. स्वत: तिवारी यांनी देखील मी मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे म्हटले आहे.