Delhi Election Result: सलग तिसऱ्यांदा दिल्ली जिंकणाऱ्या अरविंद केजरीवाल यांची संपत्ती किती?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 08:25 PM2020-02-11T20:25:12+5:302020-02-11T20:25:26+5:30
आज लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला.
नवी दिल्ली - आज लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला. निकालांच्या सुरुवातीपासूनच मोठा आघाडी घेणाऱ्या आपसमोर भाजपा आणि काँग्रेस हे प्रतिस्पर्धी पक्ष भुईसपाट झाले. दरम्यान, सलग तिसऱ्यांदा दिल्ली जिंकत मुख्यमंत्रीपद पटकावणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या संपत्तीबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील संपत्तीच्या विवरणामधून त्यांच्या मालमत्तेचा तपशील समोर आला होता. त्यानुसार अरविंद केजरीवाल यांच्याकडे ३.४० कोटी रुपयांची संपत्ती आहे. २०१५ च्या तुलनेत केजरीवाल यांच्या संपत्तीत दीड कोटी रुपयांनी वाढ झालेली आहे.
केजरीवाल यांच्याकडे ९ लाख ६५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि मुदत ठेवीमधील गुंतवणूक आहे. तर त्यांच्याकडे १ कोटी ९२ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. २०१५ मध्ये केजरीवाल यांनी आपल्याकडे २.१० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले होते. दरम्यान, केजरीवाल यांची पत्नी सुनिता केजरीवाल यांच्याकडे ५७ लाख इतकी संपत्ती आहे.