Delhi Election Results: वर्मा, लेखी, हर्षवर्धन यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपला 'भोपळाच'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 03:25 PM2020-02-12T15:25:22+5:302020-02-12T15:28:04+5:30
भारतीय जनता पक्षाचे खासदार परवेश वर्मा, मीनाक्षी लेखी आणि डॉ. हर्षवर्धन यांच्या मतदारसंघात भाजपला 30 पैकी एकही जागा जिंकता आली नाही.
नवी दिल्ली : दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रचार करून विजयाची स्वप्न पाहणाऱ्या भाजपसाठी निवडणुकीचा निकाल धक्कादायक ठरला आहे. आठ महिन्यांपूर्वी दिल्लीतील लोकसभा निवडणुकीत सातही जागा जिंकणाऱ्या भाजपला विधानसभा निवडणुकीत 60 पैकी फक्त 8 उमेदवार निवडून आणता आले आहे. तर भाजपाची अवस्था अशी झाली की, तीन लोकसभा मतदारसंघात त्यांना खातेही उघडता आले नाही.
भारतीय जनता पक्षाचे खासदार परवेश वर्मा, मीनाक्षी लेखी आणि डॉ. हर्षवर्धन यांच्या मतदारसंघात भाजपला 30 पैकी एकही जागा जिंकता आली नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी खासदार परवेश वर्मा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले होते. वर्मा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केजरीवाल यांना 'दहशतवादी' म्हटले होते.
परवेश वर्मा हे पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणून आले आहेत. त्यांच्या लोकसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी 10 जागा होत्या. या जागा मडीपूर, जनकपुरी, द्वारका, राजौरी गार्डन, विकासपुरी, हरिनगर, उत्तम नगर, नजफगड, मटियाला आणि टिळक नगर आहेत. मात्र या 10 जागांवर भाजपला एकही जागा जिंकता आली नाही.
त्याचप्रमाणे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या मीनाक्षी लेखी नवी दिल्ली मतदारसंघातून विजयी झाल्या आहे. त्यांच्या लोकसभा मतदारसंघात सुद्धा 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. ज्यात ककरोल बाग, राजेंद्र नगर, मालवीय नगर, पटेल नगर, नई दिल्ली, आरके पुरम, मोती नगर, कस्तूरबा नगर, ग्रेटर कैलाश और दिल्ली कैंट या मतदारसंघाचा समावेश आहे. मात्र आपच्या लाटेसमोर मीनाक्षी लेखी यांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही.
चांदनी चौक लोकसभा मतदारसंघात सुद्धा भाजपचे डॉ. हर्षवर्धन खासदार म्हणून निवडणून आले असून, त्यांच्या मतदारसंघात सुद्धा 10 विधानसभा मतदारसंघ येतात. ज्यात आदर्श नगर, शालीमार बाग, शकूर बस्ती, त्रिनगर, वजीरपुर, मॉडल टाउन, सदर बजार, चांदनी चौक, मटियामहल और बल्लीमारान या मतदारसंघाचा समावेश आहे. तर या दहा जागांपैकी भाजपाला एकही जागा जिंकता आलेली नाही. आम आदमी पक्षाने या सर्व जागा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.