Delhi Election Results : दिल्लीतील 61 टक्के नवनिर्वाचित आमदारांवर दाखल आहेत गंभीर गुन्हे, बलात्कार विनयभंगाचेही आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 08:11 PM2020-02-14T20:11:46+5:302020-02-14T20:20:13+5:30
इतर पक्षांपेक्षा वेगळे राजकारण करण्याचे वचन देत राजकारणात उतलेली आप आणि पार्टी विथ डिफरन्सची घोषणा करणाऱ्या भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांबाबत एक धक्कादायक महिती समोर आली आहे.
नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला. आपला एकूण 70 जागांपैकी 62 जागांवर विजय मिळाला. तर भाजपाला केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान, इतर पक्षांपेक्षा वेगळे राजकारण करण्याचे वचन देत राजकारणात उतलेली आप आणि पार्टी विथ डिफरन्सची घोषणा करणाऱ्या भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांबाबत एक धक्कादायक महिती समोर आली आहे. दिल्लीतील एकूण 61 टक्के म्हणजेच 43 नविर्वाचित आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) च्या अहवालामधून ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार दिल्लीतील 70 पैकी 43 आमदारांवर कुठला ना कुठला गुन्हा दाखल आहे. त्यापैकी 13 आमदारांवर महिलांच्या शोषणासंबंधीचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील आपच्या एका आमदारावर बलात्काराचा आरोप आहे. तर एकावर हत्येचा प्रयत्न आणि दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
नवनिर्वाचित आमदारांपैकी 37 आमदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. दिल्ली विधानसभेच्या मावळत्या सभागृहातील 24 आमदारांवर गुन्हे नोंद होते. मात्र यावेळी हा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आपच्या 62 नवनिर्वाचित आमदारांपैकी 33 जणांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तर भाजपाच्या आठ पैकी चार जणांविरोधात गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.
संबंधित महत्त्वाच्या बातम्या
Delhi Election Results : भाजपा नेत्यांची वादग्रस्त विधाने भोवली, अमित शाह यांनी चूक कबूल केली
गंभीर नसता तर भाजपाची अवस्था झाली असती आणखी गंभीर; जाणून घ्या कशी?
दरम्यान, आपचे रिठाला येथील आमदार मोहिंदर गोयल यांनी आपल्यावर कलम 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा नोंद असल्याचे निवडणुकीच्या शपथपत्रात नोंद केले आङे. त्याशिवाय आपच्या अमानतुल्ला खान, दिनेश मोहिनिशा, प्रकाश, जरनेल सिंह आणि सोमनाथ भारती यांच्याविरोधात कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा आरोप आहे. तर भाजपाचे नवनिर्वाचित आमदार अभय वर्मा आणि अनिल वाजपेयी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.