Delhi Election Results: लग्नाच्या मागण्यांनंतर मतांचा पाऊस; आपचा 'मोस्ट सुटेबल बॅचलर' विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 04:56 PM2020-02-11T16:56:11+5:302020-02-11T18:21:08+5:30
राजेंद्र नगर मतदारसंघात राघव चढ्ढा यांचा दणदणीत विजय
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टीनं ६० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत पुन्हा एकदा दणदणीत विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. सध्या आप ६३ जागांवर आघाडीवर असून भाजपा ७ मतदारसंघांत पुढे आहे. सलग दोन निवडणुकांमध्ये ६० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा करिश्मा आपनं करुन दाखवला आहे.
आपचे राघव चढ्ढा यांनी राजेंद्र नगर विधानसभा मतदारसंघातून जवळपास २० हजार मतांनी विजय मिळवला आहे. ३१ वर्षांच्या चढ्ढा यांच्यासमोर भाजपाच्या आर. पी. सिंह यांचं आव्हान होतं. मात्र सुरुवातीपासून चढ्ढा यांनी आघाडी घेतली. अखेरपर्यंत त्यांनी ही आघाडी टिकवत दणदणीत विजय संपादन केला. राघव चढ्ढा यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली होती. तर सिंह २०१३, २०१५ मध्येही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होते.
#WATCH Aam Aadmi Party's Raghav Chadha celebrates with party workers as trends show he is leading from Rajinder Nagar constituency. pic.twitter.com/KTDmilbjrV
— ANI (@ANI) February 11, 2020
पेशानं चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या राघव चढ्ढा यांनी गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती. दक्षिण दिल्लीमधून त्यांना भाजपाच्या रमेश बिधुरी यांच्याविरोधात त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र ते पराभूत झाले. विद्यमान आमदार विजेंदर गर्ग यांचं तिकीट कापून यंदा आपनं त्यांना संधी दिली. 'राजेंद्र नगर का बेटा' असं म्हणत त्यांनी प्रचार केला होता.
यंदाच्या निवडणुकीत राघव चढ्ढा आपचे स्टार प्रचारक होते. चढ्ढा यांची टीम सोशल मीडियावर अतिशय सक्रीय आहेत. चढ्ढा विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत असताना त्यांना लग्नासाठी अनेक प्रस्ताव आले. एका महिलेनं त्यांना थेट ट्विटरवर टॅग करत लग्नाची मागणी घातली. हा प्रस्ताव चढ्ढा यांनी अतिशय कौशल्यानं हाताळला. 'सध्या देशाची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत नसल्यानं ही वेळ लग्नासाठी योग्य नाही,' असं कारण देत चढ्ढा यांनी संबंधित महिलेसोबत लग्न करण्यास विनम्र नकार दिला.