Delhi Election Results : मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपाची मुसंडी; तब्बल १९ हजार मतांची आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 01:33 PM2020-02-11T13:33:45+5:302020-02-11T13:44:39+5:30
Delhi Assembly Election 2020 Results News : भाजपाच्या जगदीश प्रधान यांच्याकडे मोठी आघाडी
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीला स्पष्ट कौल दिला आहे. आपनं ५८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा १२ मतदारसंघांत पुढे आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा आपचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे.
दिल्लीत भाजपाला १२ जागांवरच यश मिळताना दिसत आहे. यापैकी मुस्तफाबाद मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहे. मुस्तफाबाद मुस्लिमबहुल मतदारसंघ आहे. मात्र तरीही मुस्तफाबादमध्ये भाजपा उमेदवार जगदीश प्रधान यांना ६७ हजार ९७६ मतं मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी आम आदमी पार्टीचे उमेदवार हाजी युनूस यांना ४८ हजार ८५२ मतं मिळाली आहेत. मतमोजणीच्या १६ फेऱ्यांनंतर प्रधान यांच्याकडे जवळपास २१ हजार मतांची आघाडी आहे. मतमोजणीच्या १० फेऱ्या अद्याप शिल्लक आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला दिल्लीत केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. आपनं ७० पैकी ६७ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. यंदाही काँग्रेसच्या कामगिरीत सुधारणा झालेली नाही. मात्र भाजपाच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या जागांमध्ये चौपट वाढ झाली आहे.