PM मोदी तीन वेळा पाया पडले; 'त्या' उमेदवाराने केला अवध ओझा यांचा पराभव; जाणून घ्या कोण आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 13:52 IST2025-02-08T13:50:37+5:302025-02-08T13:52:36+5:30

Delhi Election Result : दिल्लीच्या पटपडगंज मतदारसंघातील आपचे उमेदवार अवध ओझा यांनी आपला पराभव मान्य केला आहे.

Delhi Elections Result 2025 Patparganj Seat : BJP Wins AAP Stronghold As Avadh Ojha Loses His Election To  Ravinder Singh Negi  | PM मोदी तीन वेळा पाया पडले; 'त्या' उमेदवाराने केला अवध ओझा यांचा पराभव; जाणून घ्या कोण आहेत?

PM मोदी तीन वेळा पाया पडले; 'त्या' उमेदवाराने केला अवध ओझा यांचा पराभव; जाणून घ्या कोण आहेत?

Delhi Election Result : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू आहे. भाजपला बहुमत मिळत आहे. २७ वर्षानंतर भाजप दिल्लीत सत्तेवर येताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा ४५, आप २५ जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे आपचे प्रमुख नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पराभूत झाले आहेत. भाजपाच्या प्रवेश वर्मा यांनी केजरीवालांना ३१८६ मतांनी पराभूत केले आहे. 

दुसरीकडे, दिल्लीच्या पटपडगंज मतदारसंघातील आपचे उमेदवार अवध ओझा यांनी आपला पराभव मान्य केला आहे. निवडणुकीत अवध ओझा यांचा भाजपच्या रवींद्र सिंह नेगी यांनी पराभव केला आहे. गेल्या निवडणुकीत पटपडगंज मतदारसंघात रवींद्र सिंह नेगी यांनी मनीष सिसोदिया यांना कडवी टक्कर दिली होती. तेव्हा कमी मतांच्या फरकाने मनीष सिसोदिया निवडणूक जिंकू शकले होते. यंदाच्या निवडणुकीत मनीष सिसोदिया यांनी पटपडगंज ऐवजी जंगपुरा येथून निवडणूक लढवली. मात्र, त्यांना जंगपुरा येथे पराभव पत्करावा लागला. 

भारतीय निवडणूक आयोगाच्या मते, मतमोजणीच्या १३ पैकी १० फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. ज्यामध्ये भाजप उमेदवार रवींद्र सिंह नेगी २२ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. रवींद्र सिंह नेगी यांना एकूण ५८,८२१ मते मिळाली, तर आपचे उमेदवार अवध ओझा यांना ३६,५७८ मते मिळाली. काँग्रेसचे अनिल चौधरी तिसऱ्या क्रमांकावर राहिले, त्यांना १२१७६ मते मिळाली आहेत. दरम्यान, आपचे उमेदवार अवध ओझा यांनी आपला पराभव मान्य केला आहे.   

अवध ओझा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "मी जनतेचे आभार मानतो. मी दुसरा स्थानकावर आलो. पुढच्या वेळी स्वतः अव्वल स्थानावर येण्याचा प्रयत्न करेन. मी सर्वांना भेटू शकलो नाही, ही माझी चूक होती. कदाचित मला यासाठी योग्य वेळ मिळाला नसेल, पण तरीही मी या पराभवाची वैयक्तिक जबाबदारी घेतो." आप २०१३ पासून पटपडगंज मतदारसंघातून सातत्याने निवडणूक जिंकत होती आणि मनीष सिसोदिया येथून आमदार म्हणून निवडून आले होते.

रवींद्र सिंह नेगी कोण आहेत?
दरम्यान, पटपडगंजमधील 'आप'चा किल्ला उद्ध्वस्त करणारे रवींद्र सिंह नेगी कोण आहेत? त्यांच्याबद्दल जाणून घ्या... रवींद्र सिंह नेगी हे विनोद नगर येथील भाजप नगरसेवक आहेत. विनोद नगर वॉर्ड हा पटपडगंज विधानसभा मतदारसंघात येतो. रवींद्र सिंह नेगी हे पटपडगंज परिसरातील एक प्रसिद्ध नाव आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र सिंह नेगी यांनी मनीष सिसोदिया यांना कडवी टक्कर दिली होती. त्यामुळे ते राष्ट्रीय पातळीवर चर्चेत होते. रवींद्र सिंह नेगी हे मूळचे उत्तराखंडचे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन वेळा पाया पडले!
पटपडगंज जागेवर विजय मिळवणारे भाजपचे रवींद्र सिंह नेगी हे तेच व्यक्ती आहेत, ज्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क तीन वेळा खाली वाकून पाया पडले होते. दरम्यान, प्रचार रॅलीनंतर उमेदवार रवींद्र सिंह नेगी यांनी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरणस्पर्श केले. त्यानंतर नरेंद्र मोदींनीही तीन वेळा त्यांच्या पाया पडले. हे पाहून मंचावर उपस्थित सारेच आश्चर्यचकित झाले. तसेच,  यासंबंधीचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Web Title: Delhi Elections Result 2025 Patparganj Seat : BJP Wins AAP Stronghold As Avadh Ojha Loses His Election To  Ravinder Singh Negi 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.