"नरेंद्र मोदी माझे मित्र, १८ तास काम करतात", दिल्ली निवडणुकीत शत्रुघ्न सिन्हांचा जोरदार निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 10:32 IST2025-02-03T10:32:27+5:302025-02-03T10:32:57+5:30
Delhi Elections : तृणमूल काँग्रेस (टीएमसी) खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही आम आदमी पक्षासाठी (आप) रविवारी दिल्लीत प्रचार केला.

"नरेंद्र मोदी माझे मित्र, १८ तास काम करतात", दिल्ली निवडणुकीत शत्रुघ्न सिन्हांचा जोरदार निशाणा
Delhi Elections : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या निवडणुकीत अनेक मोठे नेते प्रचार करत आहेत. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही आम आदमी पक्षासाठी (आप) रविवारी दिल्लीत प्रचार केला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाआपले मित्र म्हणत त्यांच्यावर एक प्रकारे निशाणा शत्रुघ्न सिन्हा यांनी साधला आहे. प्रचारादरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'प्रचार मंत्री' असे संबोधले. ते म्हणाले, नरेंद्र मोदी दररोज १० ते १२ तास प्रचार करतात. दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांनी आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार आतिशी यांच्या समर्थनार्थ एका निवडणूक रॅलीला हजेरी लावली होती. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि आप हे इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत.
शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ते म्हणाले, "आमचे आदरणीय प्रचार मंत्री म्हणजे पंतप्रधान. ते माझे मित्र आहेत आणि माझे पंतप्रधानही आहेत. असे म्हटले जाते की, ते १८ तास काम करतात, पण मला ते १० ते १२ तास प्रचारात व्यस्त असल्याचे दिसून येते. पालिका निवडणूक असो, विधानसभेची किंवा संसदीय निवडणूक असो, तुम्ही कुठेही पाहा आपले माननीय पंतप्रधान नक्कीच जातात."
याचबरोबर, शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागील निवडणुकीतील दोन कोटी नोकऱ्या, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, प्रत्येक व्यक्तीच्या बँक खात्यात १५ लाख रुपये देणे यासारख्या आश्वासनांचा उल्लेख केला. तसेच, ही आश्वासने पूर्ण झाली नाहीत, असा आरोप शत्रुघ्न सिन्हा यांनी केला.