इलेक्ट्रीशियनच्या मुलाला ७० लाखांचं पॅकेज, एक वर्ष सोडावं लागलं होतं शिक्षण!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 02:49 PM2018-08-22T14:49:35+5:302018-08-22T14:50:27+5:30
जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर एनएसआयटीमध्ये बॅचलर ऑफ आर्किटेक्चरमध्ये त्याचं अॅडमिशन झालं होतं. पण आर्थिक अडचणींमुळे त्याला शिक्षण पूर्ण करता आलं नव्हतं.
(Image Credit : www.jagran.com)
नवी दिल्ली : इच्छा आणि मेहनत करायची तयारी असेल तर यशाला गवसणी घालता येते हे निश्चित आहे. असाच काहीसा कारनामा २२ वर्षीय मोहम्मद आमिर अली याने केला आहे. अमेरिकेतील एका कंपनीने त्याला चक्क ७० लाखांचं वार्षिक पॅकेज असलेली नोकरी दिली आहे. जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर एनएसआयटीमध्ये बॅचलर ऑफ आर्किटेक्चरमध्ये त्याचं अॅडमिशन झालं होतं. पण आर्थिक अडचणींमुळे त्याला शिक्षण पूर्ण करता आलं नव्हतं.
एका वर्षात सोडलं होतं शिक्षण
२०१४ मध्ये १२वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅत आणि बायोलॉजीमध्ये ७०.८ टक्के गुण मिळवणाऱ्या आमिरने एका वर्षासाठी शिक्षण सोडलं होतं. २०१५ मध्ये जामिया विश्वविद्यालयात त्याने इंजिनिअरींग डिप्लोमाची प्रवेश परीक्षा दिली होती. इथे त्याने २०१५ ते २०१८ दरम्यान मेकॅनिकल इंजिनिअरींगमध्ये डिप्लोमा केला. आता आमिरला अमेरिकेतील फ्रिजन मोटर वर्क्सने बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम इंजिनिअर पदाची नोकरी दिली आहे.
इलेक्ट्रिक विषयात आहे आवड
आमिर हा मुळचा उत्तर प्रदेशातील मेरठचा राहणारा आहे आणि दिल्लीतील जामिया नगरमध्ये राहतो. आमिरची आवड इलेक्ट्रिक विषयात आहे. त्याने जामियातील सेंटर फॉर इनोव्हेशन अॅन्ड इंटरप्रेन्योरशिप अंतर्गत इलेक्ट्रीक कार प्रोजेक्टमध्ये काम केलं होतं.
वडिलांनी घेतलं होतं कर्ज
आमिरचे वडील शमशाद अली जामियामध्ये इलेक्ट्रीशियन आहेत. त्यांनी कर्ज घेऊन ४० ते ५० हजार रुपयांची एक मारुती कार आमिरला खरेदी करुन दिली. आमिरने आपल्या मेहनतीने या कारला इलेक्ट्रीक कारमध्ये रुपांतरित केले. यानंतर आमिर चांगलाच चर्चेत आला होता. आमिरचं हे काम पाहून देश-विदेशातील कंपन्यांची लक्ष त्याच्याकडे गेलं. आणि त्यातून त्याला ही संधी मिळाली.