विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! "या" विद्यापीठातून पास होणाऱ्या प्रत्येकाला मिळणार नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 01:30 PM2020-10-15T13:30:42+5:302020-10-15T13:32:02+5:30
Delhi Skill and Entrepreneurship University : विद्यापीठातून पास होणाऱ्या प्रत्येकाला नोकरी मिळणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवीन विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली - शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेकांना नोकरीची चिंता सतावत असते. विद्यार्थ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. कारण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवीन विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या विद्यापीठातून पास होणाऱ्या प्रत्येकाला नोकरी मिळणार आहे. Delhi Skill and Entrepreneurship University असं या विद्यापीठाचं नाव असून पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या विद्यापीठातील अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राला सुरुवात होणार आहे.
केजरीवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिनियमानुसार या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. "विद्यापीठाविषयी माहिती देताना खूप आनंद होत आहे. विद्यापीठाची पहिली बैठक पार पडली आहे. यामध्ये कुलपती आणि बोर्डाच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता" अशी माहिती केजरीवाल यांनी दिली आहे. तसेच प्रत्येकाला रोजगार मिळवून देणं हाच उद्देश आहे. तसंच नवीन व्यापार करण्यासाठी त्यांना सक्षम करणं हा देखील यामागील उद्देश आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
I am excited that the first meeting of "Delhi Skill and Entrepreneurship University" took place today. I met all Board members | LIVE https://t.co/ZxEJBRAAJh
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 12, 2020
विद्यापीठाच्या बोर्ड सदस्यांमध्ये अनुभवी आणि यशस्वी व्यक्तींचा समावेश
सरकारने यासाठी आयआयएम-अहमदाबादमधील सेंटर फॉर इनोव्हेशन इनक्युबेशन अँड इंटररप्रेन्योरशिपच्या प्रमुख डॉ. निहारिका वोहरा यांची कुलपती म्हणून निवड केली आहे. त्याचबरोबर या विद्यापीठाच्या बोर्ड सदस्यांमध्ये अनुभवी आणि यशस्वी व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे संस्थापक डीन प्रमथ राज सिन्हा, जॅनपॅक्टचे संस्थापक प्रमोद भसीन, नोकरी डॉटकॉमचे संस्थापक संजीव बिखचंदानी, उद्योजक श्रीकांत शास्त्री आणि आयपी विद्यापीठाचे संस्थापक के. के. अग्रवाल यांचा समावेश आहे.
"प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार देणं, त्यांना सक्षम करणं हा एकमेव उद्देश"
आम्ही विद्यापीठाचे कुलपती आणि बोर्डाच्या अन्य सदस्यांची नियुक्ती केली आहे. या विद्यापीठातून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार देणं, त्यांना सक्षम करणं हा एकमेव उद्देश आहे. मी सर्वांशी याबाबत योग्य ती चर्चा केली आहे अशी माहिती केजरीवाल यांनी दिली आहे. तसेच या विद्यापीठामध्ये गुणवत्ता आणि योग्य शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. त्याचबरोबर अनेक कंपन्यांशी करारदेखील करण्यात येणार आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे.