"ED एंटरटेनमेंट डिपार्टमेंट बनले आहे...", संजय सिंह यांचे न्यायालयात विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 05:54 PM2023-10-13T17:54:49+5:302023-10-13T18:36:13+5:30
विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांच्या न्यायालयात संजय सिंह यांना हजर करण्यात आले.
नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आम आदमी पक्षाचे (आप) नेते संजय सिंह यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने शुक्रवारी 27 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. ईडीच्या रिमांडची मुदत संपल्यानंतर संजय सिंह यांना न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांच्या न्यायालयात संजय सिंह यांना हजर करण्यात आले.
ईडीने संजय सिंह यांच्या कोठडीची मागणी केली नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयाने 27 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. संजय सिंह यांच्या वकिलाने न्यायालयात युक्तिवाद केला की, संजय सिंह यांना तुरुंगात आवश्यक वैद्यकीय साहित्य पुरवले जावे. त्यावर न्यायालयाने संजय सिंह यांना तुरुंगात औषधे आणि वैद्यकीय उपकरणे (शुगर पॅच) उपलब्ध करून द्यावीत, असे आदेश दिले आहेत.
माझी क्वचितच चौकशी झाली, असे संजय सिंह यांनी हजेरीदरम्यान न्यायालयात सांगितले. इतकेच नाही तर ईडी हे एंटरटेनमेंट डिपार्टमेंट बनल्याचे संजय सिंह म्हणाले. तसेच, मी ईडीकडे कोणाचीही तक्रार केली असता काहीही झाले नाही, असे संजय सिंह यांनी सांगितले. दरम्यान, अशा विधानांवर नाराजी व्यक्त करत न्यायालयाने म्हटले की, संजय सिंह यांना असे काही म्हणायचे असेल तर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर व्हावे.
याचबरोबर, व्हीसीमार्फत हजर व्हायचे आहे की न्यायालयात यायचे आहे, असे न्यायालयाने विचारले असता, संजय सिंह म्हणाले की, मी न्यायालयात हजर राहणार आहे. दरम्यान, कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीने 4 ऑक्टोबर रोजी राज्यसभा सदस्य संजय सिंह यांना अटक केली होती.