केजरीवाल 177 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर, समर्थकांकडून जोरदार स्वागत; म्हणाले- यांचे कारागृहदेखील...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 07:10 PM2024-09-13T19:10:42+5:302024-09-13T19:11:22+5:30
न्यायालयाच्या निर्णयानंतर, आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण आनंद व्यक्त करत आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अखेर 177 दिवसांनंतर तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत. दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातून त्यांना जामीन मिळाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर, आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण आनंद व्यक्त करत आहेत.
156 दिवस कारागृहात..., 177 दिवसांनंतर जामीन... -
खरे तर, अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती. यावर, 10 दिवसांच्या चौकशीनंतर त्यांना 1 एप्रिलला तिहार तुरुंगात पाठवण्यात आले होते. यानंतर 10 मेरोजी त्यांना 21 दिवसांसाठी सार्वत्रिक निवडणुकीत प्रचार करण्यासाठी सोडण्यात आले होते. निवडणुकीनंतर 2 जूनला त्यांनी पुन्हा तिहार कारागृहात सरेंडर केले होते. ही 21 दिवसांची सुटका वगळल्यास केजरीवाल एकूण 156 दिवस कारागृहात राहिले आहेत. पण त्यांना खऱ्या अर्थाने जामीन 177 दिवसांनंतर मिळाला आहे.
AAP कार्यकर्त्यांना केलं संबोधित -
कारागृहातून बाहेर आल्यानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, माझ्यासाठी लाखो लोकांनी प्रार्थना केली होती. त्यांच्या प्रार्थनेमुळे आज बाहेर आलो आहे. यांचे कारागृहदेखील केजरीवालचे मनोबल तोडू शकले नाही.
केजरीवाल पुढे म्हणाले, "मी इश्वराकडे प्रार्थना करतो की, त्याने मला आतापर्यंत जशी शक्ती दिली, त्याच पद्दतीने तो मला मार्ग दाखवत राहो. मी देशाची सेवा करत राहो आणि देशात फूट पाडण्याऱ्या, तसेच देशाला कमकुवत करणाऱ्या देशविरोधी शक्तींविरोधात मी आयुष्यभर लढत राहो.
साज़िश पर सत्य की जीत हुई। तिहाड़ जेल से बाहर आए CM अरविंद केजरीवाल। LIVE https://t.co/1eVNK559Lb
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 13, 2024
जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस उज्जल भुइयां यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांच्या जामिनावर निर्णय सुनावला आहे.